अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगरसह राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त 16 जागांसाठी मागील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 25) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. येत्या 1 जूनपर्यंत म्हणजेच आठ दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत राहणार आहे.
दरम्यान, विधान परिषदेची अहिल्यानगरची जागा कोणाला? महायुतीलमधील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार की ऐनवळी भाजप ही जागा पटकवणार याकडे मतदारांचे लक्ष लागले असले तरी सध्या तरी या जागेबाबत महायुतीसह महाविकास आघाडीकडून चुप्पी साधण्यात आली असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर विधान परिषद निवडणुकीतील इच्छुक उमेवारांचा महापूर आला असून या ‘सोशल मीडिया’ उमेदवारांचा उमेदवारीसाठी दावा सुरू असल्याचे दिसत आहे.
नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 2022 पासून तत्कालीन आमदार स्व. अरूणकाका जगताप यांचा कार्यकाळपूर्ण झाल्यानंतर गेल्या चार वर्षापासून ही रिक्त आहे. दरम्यान, 2022 ला जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीसह, नगर पालिका यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त होत्या. त्यावेळी एकूण मतदारांच्या 71 टक्क्यांर्पंत मतदार कार्यरत असल्याने जिल्ह्यातील विधान परिषदेची निवडणूक लांबली होती. त्यातील आता देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 89 जागा रिक्त असल्या तरी नगर पालिका, नगर परिषद व महानगर पालिकांच्या नगरसेवकांच्या 82.47 टक्के जागा कार्यरत असल्याने ही निवडणूक जाहीर झालेली आहे. निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली असून सोमवार (दि. 25) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. येत्या 1 जून पर्यंत जिल्ह्यातील इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
राज्यातील कोणीही व्यक्ती नगर जिल्ह्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी करू शकतो. उमेदवारी करताना त्या उमेदवाराला नगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मतदार यादीतील 10 मतदार सूचक म्हणून आवश्यक असणार आहेत. 2 जूनला दाखल अर्जांची छाननी व 4 जूनला माघारीची अंतिम मुदत आहे. मतदान 18 जूनला सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार असून, मतमोजणी 22 जूनला नगरमध्ये होणार आहे.
ओपनला 10 तर राखीवला 5 हजार अनामत
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी दाखल करता येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. आशिया हेच निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. जिल्ह्यातील 14 तहसील कार्यालये मतदान केंद्र असणार आहेत व मतमोजणी अहिल्यानगर शहरात जिल्हास्तरावर होणार आहे. उमेदवारी दाखल करू इच्छिणार्या उमेदवारास खुल्या प्रवर्गासाठी 10 हजार रुपये व राखीव प्रवर्गासाठी 5 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
पसंती क्रमांकांनुसार मतदान
या निवडणुकीत मतपत्रिका असणार आहे. यातील उमेदवारांना पसंती क्रमांकानुसार मतदान मतदारांना करावे लागणार आहे. यासाठी विशिष्ट पेन प्रत्येक मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाकडून दिला जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी जंबो बॅलेट बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे.




