मुंबई | Mumbai
हिंदीसक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातून उमटलेले पडसाद लक्षात घेऊन आगामी महापालिका निवडणुकीत जनमत विरोधात जाऊ नये, याची काळजी घेऊन सरकारमधील पक्षांनी शासन अध्यादेश रद्द करत असल्याची घोषणा केली. दुसरीकडे सरकारविरोधातील मोर्चा रद्द करून मराठी माणसांच्या जल्लोष मेळाव्याचे आयोजन मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने केले आहे. येत्या ५ तारखेला सकाळी १० वाजता वरळीतील एनएससीआय डोममध्ये हा मेळावा पार पडणार आहे.
जवळपास १९ वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर सर्व शक्तीनिशी एकत्र येणार आहे. दरम्यान ही सुरुवात आहे. असे म्हणत ठाकरे बंधूनी ५ जुलैच्या मेळाव्यासाठी दुसरे जाहीर निमंत्रण मराठी बांधवांना दिलेय. त्याआधी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नविनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आदेश दिलाय.
संयुक्त सभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाकरेंची सेना आणि मनसेने जोरदार तयारी केली आहे. दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांवर विशेष जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत. सभेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ५ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याला आपण पक्षाचा झेंडा, स्कार्फ, बिल्ला, पक्षचिन्ह असलेले प्लाकार्ड तसेच फलक, बॅनर किंवा होर्डिंगवर पक्षाचे नाव आणि झेंडा लावू नये किंबहुना आणू नये. प्रभागात लावण्यात आलेल्या फलकांवरही पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरू नये. दिलेल्या सूचनांचे आपण पालन करावे. ह्या मेळाव्याला कोणताही झेंडा नको फक्त मराठीचा अजेंडा असू दे. सभेला कोणत्याही पक्षाचे लेबल लागू नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
मराठी माणसांच्या हितासाठी आमच्यातले क्षुल्लक आणि किरकोळ वाद संपवायला तयार आहोत, असे विधान मनसेप्रमुख राज ठाकरेंनी करून उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याबाबत संकेत दिले होते. त्यानंतर आता मेळाव्याच्या दुसऱ्या निमंत्रण पत्रिकेवरून दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





