मुंबई | Mumbai
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमधील घोळ समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज (रविवारी) गोरेगाव (पू) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदार यादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या मतदार यादीसंदर्भात (Voter List) सर्वात मोठा खळबळजनक आरोप केला आहे.
यावेळ ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मतदारयादीत ९६ लाख खोटे मतदार भरले आहेत. यात मुंबई, पुणे, नाशिक येथे ८ ते ८.५ लाख मतदार भरले आहे.जर अशाच निवडणुका होणार असतील तर मग कशासाठी प्रचार करायचा,कशाला पैसे खर्च करायचे, कशाला उमेदवार द्यायचे? हा महाराष्ट्र आणि मतदाराचा अपमान आहे,असे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सत्ताधाऱ्यांकडून स्थानिक पक्षांना संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले, ” २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे २३२ आमदार निवडून आले. एवढे मोठे आमदार निवडून आलेले असतानाही महाराष्ट्रात सन्नाटा होता. त्यावेळी मतदारही आवाक झाले होते, तसेच निवडून आलेलेही आवाक झाले होते. त्यामुळे लोकांना कळाले की देशात निवडणुका कशा झाल्या. अनेक जण बोलतात की, राज ठाकरेंच्या सभेंना गर्दी असते, मतदान पडत नाही. अशाप्रकारच्या निवडणुका राज्यात होत असतील तर हा राज्यातील जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे. मॅच फिक्सिंग झालेले आहे, तुम्ही मतदान द्या किंवा नको. मग सांगतात की, यांचा एक आमदार निवडून आला नाही एक खासदार निवडून आला नाही. अरे कसा येणार तुम्ही अगोदरच फिक्स करून ठेवलंय”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.




