Sunday, August 9, 2026
HomeनाशिकRaj Thackeray: सिंहस्थाच्या नावाने नाशिककरांना खड्ड्यात घातलं; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Raj Thackeray: सिंहस्थाच्या नावाने नाशिककरांना खड्ड्यात घातलं; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात आहेत. त्यावर इतकी आंदोलनं झाली, पण काही नाही. प्रशासन ढिम्म आहे.सिंहस्थाच्या नावाने नाशिककरांना खड्ड्यात घातले हे सगळं चालू असताना ज्यावेळी निवडणुका झाल्या, तेव्हा लोक भाजपला निवडून देत असतील तर भोगा असे म्हणत राज ठाकरेंनी नाशिककरांना सुनावले.

गुजरातमधील कंत्राटदारांना प्राधान्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले असता माध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते.यावेळी ठाकरे यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवर, शहरातील रस्त्यांची दुरवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यापारीकरणावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कुंभमेळ्याच्या कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना प्राधान्य दिल्याचा आरोप करत त्यांनी प्रत्येकाला फक्त कमिशनशी देणंघेणं आहे,असा घणाघात केला.

- Advertisement -

प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नाही
राज ठाकरे म्हणाले, २००३ आणि २०१५ या दोन्ही कुंभमेळ्यांचा अनुभव आपल्या समोर आहे. २०१५ मध्ये शहरात विकासकामे झाली, मात्र नागरिकांना त्याचा त्रास झाला नाही. आज मात्र संपूर्ण शहर खड्ड्यांनी व्यापले असून अपघातात नागरिकांचे बळी जात आहेत. तरीही प्रशासनाला त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचा आरोप त्यांनी केला.

स्मार्ट सिटी योजनेचे काय झाले
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बाहेरील राज्यातील कंत्राटदार आणले जात असल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत त्यांनी, महाराष्ट्रात सक्षम कंत्राटदार नाहीत का? असा सवाल केला. तसेच स्मार्ट सिटी योजनेचे काय झाले, शहराच्या विकासासाठी झालेल्या घोषणांचे पुढे काय झाले, अशी विचारणाही त्यांनी केली. शहरातील वृक्षतोड, विकासकामांची दुर्दशा आणि प्रशासनाची उदासीनता यावरही त्यांनी टीका केली.
यावेळी त्यांनी मतदारांनाही लक्ष्य करत, हे सर्व घडत असतानाही जर लोक त्याच पक्षाला निवडून देत असतील, तर त्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली पाहिजे, असा टोला लगावला.

शिक्षण क्षेत्रातील व्यापारीकरणावरही निशाणा
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवरही कठोर शब्दांत टीका केली. महाविद्यालयांपेक्षा कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी क्लासेस आणि महाविद्यालयांच्या संगनमतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नीट परीक्षेच्या पेपरफुटीचा उल्लेख करत त्यांनी, पेपरफुटीच्या अनेक घटनांमध्ये कोचिंग क्लासेसचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे या व्यवस्थेवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, असे सांगितले. विद्यार्थ्यांवर वाढणारा मानसिक ताण, नैराश्य आणि आत्महत्यांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सरकारने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी केली.

मला कोणी सांगितलच नाही की ते आले, मी दिलगीरी व्यक्त करतो
राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेत गुरुवारी त्यांना भेटायला आलेले पॅरा धावपटू दिलीप गावित यांच्यासोबत झालेल्या प्रकाराबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की, ‘काल दिलीप गावित हे येऊन गेले, सर्वात महत्वाचा भाग त्यांना कोणी बोलवलं होत हे मला माहित नाही आणि ते आलेत हे सुद्धा मला कोणी सांगितलं नव्हतं. त्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही असं मी का करेन? त्यामुळे मला माहितच नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यांचा सुद्धा काही गैरसमज झाला. ते दोन तास थांबले आणि मला भेटले नाहीत अशी त्यांची तक्रार होती, पण मला याबाबत काही माहीतच नव्हतं. मला कोणी सांगितलंच नाही कि ते आलेत म्हणून, मला कोणी सांगितलं असतं तर मी निश्चित त्यांना नक्की भेटलो असतो. त्यांची भेट झाली नाही आणि ते नाराज झाले याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मला वाटतं ते दिल्लीला गेलेले आहेत. ते दिल्लीवरून जाऊन आल्यावर निश्चित त्यांची भेट घेईन. तुमचा काही संपर्क झाला तर त्यांच्या कानावर या गोष्टी घाला. मलाच काही माहित नव्हतं त्यामुळे त्यांना न भेटण्याचा कोणताही विषय नाही’.

विकासाऐवजी कमिशनखोरीला चालना
२०१५ चा कुंभमेळा नियोजनबद्ध झाला, मात्र यंदा शहरभर खड्डे, अपूर्ण कामे आणि बाहेरील कंत्राटदारांना प्राधान्य दिल्याने विकासाऐवजी कमिशनखोरीला चालना मिळाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

शिक्षण व्यवस्थेवर सवाल
कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांचे कॉलेज ठरवत आहेत, नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिक्षणाचे व्यापारीकरण रोखण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

ताज्या बातम्या

राज-का-रण : ‘राज’ की बात अन् भाजपची वाट!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा नाशिक दौरा आणि त्याचवेळी भारतीय जनता पक्षामध्ये उत्तर महाराष्ट्रात उफाळून आलेला अंतर्गत...