मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) मनसेचा (MNS) आज मुंबईत पहिलाच कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जोरदार भाषण करत त्यांनी विविध मुद्द्यांवर परखड मत मांडलं. यावेळी त्यांनी भाजपसह (BJP) महायुतीवर जोरदार टीका केली. तसेच राज ठाकरे यांनी ईडीने चौकशी केलेल्या प्रकरणावरही पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले. तर राज्यातील नेत्यांवर आरोप झाल्यानंतर भाजपवासी झालेल्या नेत्यांची यादी देखील राज ठाकरे यांनी मेळाव्यात वाचून दाखवली.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की,”आम्ही डोक्यावर तलवारी घेऊन फिरत नाही. मोदी म्हणाले होते की,७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्याला आम्ही आत टाकू, त्यांनी आत कुठे तर मंत्रिमंडळात (Cabinet) टाकले. भाजपने हेमंत बिस्वा शर्मा, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, नारायण राणे, अशोक चव्हाण या लोकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. मात्र याच लोकांना त्यांनी नंतर सोबत घेऊन मंत्री आणि मुख्यमंत्री केले. देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांनी अनेक लोकांवर आरोप केले पण आज तेच लोक त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात आहेत त्यामुळे यांनी भूमिका बदलली ते चालतं का? असे म्हणत त्यांनी सातत्याने भूमिका बदलण्याच्या टीकेवर भाष्य केले.
ईडी प्रकरणावर राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे म्हणाले की, २००५ सालाची गोष्ट असेल, मी ज्या शिवाजी पार्क मैदानात (Shivaji Park Ground) लहानाचा मोठा झालो तिथे आम्ही लहानपणापासून कोहीनूर मिल (Kohinoor Mill) पाहत होतो.येता-जाता ती मिल डोळ्यांसमोर यायची. एकेदिवशी मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली की एनटीएससीच्या म्हणजेच केंद्र सरकारच्या सर्व मिल्सबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की, त्या मिल्स काढा आणि कामगारांचे जे पगार अडकले आहेत ते देऊन टाका. मी आपली बातमी वाचत होतो. बातमी वाचत असताना तिथे यादीत कोहीनूर मिलचे नाव होतं. मी माझ्या पार्टनरला फोन केला आणि सांगितलं की, कोहीनूर मिलचे असे काही समोर येत आहे. त्यावर त्याने सांगितलं की, अरे हे प्रकरण फार मोठं आहे. मी म्हटलं, मला मान्य आहे. काय आहे ते एकदा चेक करु. मी माझ्या एका दुसऱ्या सहकाऱ्याला फोन केला. त्यांना बोलवून घेतलं आणि म्हटलं की, बसवून बघा, काय होतं. त्यांनी आकडेवारी जोडली आणि टेंडर भरुन घेण्याचा निर्णय झाला”, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की,”एकेदिवशी माझ्या सहकाऱ्यांचा घाबरत घाबरत फोन आला. टेंगर लागलं म्हणून सांगितलं. मी म्हटलं की, घाबरतो कशाला? तर म्हणजे, ४०० ते ५०० कोटींचे टेंडर होते. पैसे आणायचे कुठून? माझीसुद्धा पायाखालची जमीन सरकली होती. पण ती दाखवायची कशी? मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं. त्याने आयएलएनएफ नावाची कंपनी होती, त्या कंपनीशी ते बोलले. त्या कंपनीने सांगितले की, तुमच्याबरोबर यायला तयार आहोत आम्ही पैसे भरायला तयार आहोत. त्यामुळे सगळे पैसे कंपनीने भरले. आम्ही त्यामध्ये सात-आठ जण पार्टनर होतो. सगळं सुरु झालं आणि परत त्याला ब्रेक आला. परत ती केस कोर्टात गेली आणि सर्व मिल अडकल्या. त्यामध्ये वर्ष दीड-दीड वर्ष गेले. मग त्यानंतर सर्व दीड वर्षांनी सुरु झाले. त्या दरम्यान मी माझ्या सहाऱ्यांना म्हटले की, हा पांढरा हत्ती आहे, आपल्याला झेपायचे नाही. मग माझ्याबरोबरचे अनेक पार्टनर म्हणाले की, आपल्याला हे झेपणार नाही आणि आम्ही आमचे पैसे घेऊन त्यातून बाहेर पडलो. ही गोष्ट २००८ ची आहे. त्यानंतर आमचा विषय संपला”, असे राज ठाकरे म्हणाले.
… अन् ईडीची नोटीस आली
राज ठाकरे म्हणाले की, “ज्या दिवशी ईडीची नोटीस (ED Notice) आली, ती अचानक कशी काय आली ही भानगड समजली नाही. त्यानंतर चौकशीला मी सामोरे गेलो. त्यावेळी ते अधिकारी काय विचारत आहेत हे देखील कळतं नव्हते. आम्ही कोहिनूरच्या प्रकल्पातून बाहेर पडलो. त्या पैशांवर करही भरला. मग माझ्या सीएला बोलावले आणि त्याला हा प्रकार सांगितला. त्यावेळी त्याने सांगितले की, तुम्ही तो कर भरला तुमच्या भागिदाराने तो कर न भरता दुसरीकडे वळवला. मी म्हटलं मग आता काय करायचं? म्हणे, परत टॅक्स भरायचे. आम्ही परत सर्वांनी टॅक्स भरुन टाकला आणि विषय संपला. एवढ्या गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींचं कौतुक करु लागला? मला त्याच्याशी काय देणंघेणं? मी माझ्या डोक्यावर तलवारी घेऊन फिरत नाहीत”, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.