Friday, January 23, 2026
HomeराजकीयMNS News : मतदार यादीतील ‘बनावट’ मतदारांना शोधण्यासाठी मनसेचा मास्टर प्लॅन

MNS News : मतदार यादीतील ‘बनावट’ मतदारांना शोधण्यासाठी मनसेचा मास्टर प्लॅन

मुंबई । Mumbai

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांना रोखण्यासाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे. ‘बनावट’ मतदारांचा शोध घेण्यासाठी मनसेने बूथ-स्तरीय एजंट (बीएलए) सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. केवळ ठाणे शहरातच या मोहिमेअंतर्गत १५ ते २० हजार बीएलए नियुक्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मनसेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एजंट्सना एक विशेष रणनीती देण्यात आली आहे. मतदानाच्या वेळी जर एखादा ‘बनावट’ किंवा संशयास्पद मतदार मतदान केंद्रावर आल्यास, बीएलए त्वरित “पुष्पा” किंवा “गोंद्या” (मराठी चित्रपटातील खलनायक) असा सांकेतिक संदेश (कोड वर्ड) पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाठवतील. हा सांकेतिक संदेश मिळताच मनसेचे कार्यकर्ते त्वरित संबंधित मतदान केंद्रावर पोहोचून त्या मतदाराची पडताळणी करतील. या नव्या रणनीतीमुळे निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांतील गैरव्यवहारांवर थेट पाळत ठेवण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.

YouTube video player

मनसेच्या नेत्यांनी नुकत्याच गोरेगाव पूर्व येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या परिषदेत मतदार यादीतील गोंधळावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनसे नेते अविनाश जाधव आणि माजी आमदार राजू पाटील यांनी ठाणे आणि कल्याण ग्रामीणमधील मतदारांच्या डेटामधील विसंगतीवर टीका केली. मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी २०२० आणि २०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएम आणि मतदार यादीतील गैरव्यवहारांद्वारे मते मिळवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी कार्यकर्त्यांना बनावट मतदारांना रोखण्याचे स्पष्ट आवाहन केले. ठाण्यात बनावट मतदारांना पकडणाऱ्या एजंटना पक्षाकडून सन्मानित करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनीही त्यांच्या मतदारसंघातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीतील तफावतीकडे लक्ष वेधले. त्यांनी कार्यकर्त्यांना “पुष्पा आला रे” असे म्हणत बनावट मतदारांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. यासाठी अतिशय सक्षम आणि मजबूत बूथ-लेव्हल एजंटची (बीएलए) आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर “बनावट मतदार” समाविष्ट केल्याचा गंभीर आरोप केला होता. राज ठाकरे यांच्या दाव्यानुसार, “मुंबईत ८ ते १० लाख, तर ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रत्येकी सुमारे ८ ते ८.५ लाख बनावट मतदार जोडले गेले आहेत.” तसेच, अशाच पद्धतीने राज्यातील अनेक लहान-मोठ्या शहरांमध्येही खोटे मतदार घुसविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. मनसेची ही नवीन रणनीती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किती यशस्वी होते आणि यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...