मुंबई । Mumbai
पंतप्रधान मोदींच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित एका विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सरकारवर कडाडून टीका केली आहे. सुळेंच्या या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक परिस्थितीचा दाखला देत चोख प्रत्युत्तर दिले आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट जनतेच्या खिशाला हात घालणाऱ्या मुद्द्यांना तोंड फोडले. “देशाच्या मायबाप जनतेने सलग १२ वर्षे मोदी सरकारला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण आता १२ वर्षांनंतर देशाची आर्थिक स्थिती काय आहे, याचे आत्मचिंतन सरकारने करण्याची वेळ आली आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
“प्रचंड महागाई आणि बेरोजगारीमुळे सामान्य माणूस होरपळतो आहे. भ्रष्टाचार थांबलेला नाही. पेट्रोल-डिझेलसाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागत असून, त्यातून वाद निर्माण होत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल सुरू असून त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. कशाचेही सोंग घेता येते, पण अन्नधान्य आणि पैशांचे सोंग घेता येत नाही. हे प्रश्न सरकार कधी सोडवणार?” असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळेंच्या या धारदार टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तितक्याच संयत पण आक्रमकपणे उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, “गेल्या १२ वर्षांतील बहुतांश काळ भारताचा महागाई निर्देशांक सर्वात खाली होता. सध्या संपूर्ण जगातच आर्थिक आणि महागाईचे संकट आहे, ज्याची झळ भारतालाही बसत आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर सातत्याने योग्य उपाययोजना करत आहेत आणि त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील.”
पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याबाबत बोलताना त्यांनी जागतिक परिस्थितीकडे लक्ष वेधले. “जगातील अनेक देशांमध्ये इंधनाची आणीबाणी असून तिथं लॉकडाऊनची वेळ आली आहे. अशा परिस्थितीतही आपण पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, भविष्यात इंधन मिळणार नाही या भीतीने अचानक मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे. नागरिकांनी विनाकारण साठेबाजी करू नये,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या डिझेलचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, काही ठिकाणी इंधन तुटवड्याच्या अफवांमुळे झालेल्या हिंसक घटनांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “विनाकारण कायदा हातात घेणाऱ्या आणि हिंसा पसरवणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत,” असा इशाराही त्यांनी शेवटी दिला. पंतप्रधानांच्या १२ वर्षांच्या कामगिरीचे कौतुक आणि विरोधकांचे आर्थिक अपयशाचे आरोप, या राजकीय कलगीतुऱ्यामुळे मुंबईतील राजकीय तापमान मात्र चांगलेच वाढले आहे.




