पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
श्री क्षेत्र मोहटा देवी सार्वजनिक ट्रस्ट मंडळाच्या प्रतिक्षित विश्वस्त निवडीची घोषणा अखेर करण्यात आली असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी 2025 ते 2028 या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नव्या विश्वस्तांची अधिकृत यादी प्रसिध्द केली आहे. या निवडीसाठी तब्बल 390 अर्ज प्राप्त झाले होते. नियमांनुसार मोहटे गावातील पाच आणि इतर गावांतील पाच अशा 10 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
ट्रस्टमध्ये एकूण 15 विश्वस्तांचा समावेश असतो. त्यापैकी जिल्हा न्यायाधीश, उपवनसंरक्षक अधिकारी, पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश, तहसीलदार व गटविकास अधिकारी हे पदसिध्द विश्वस्त असून उर्वरित 10 विश्वस्तांची निवड दर तीन वर्षांनी केली जाते. राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र मोहटादेवी हे माहूरदेवीच्या साडेतीन शक्तिपीठांतील उपपीठ म्हणून ओळखले जाते. चौसष्ट योगिनी, अष्टभैरव, दशमहाविद्या यांच्या मूर्ती, तसेच श्रीयंत्राकार दर्शन रांग या वैशिष्ट्यांमुळे हे देवस्थान राज्यभरातील भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते. शारदीय नवरात्रोत्सवात येथे लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
निवड झालेले नूतन विश्वस्त पुढीलप्रमाणे –
मोहटे गाव प्रतिनिधी : बाबासाहेब रघुनाथ दहिफळे, शुभम शामराव दहिफळे, शशिकांत रामनाथ दहिफळे, अशोक भगवान दहिफळे, राजेंद्र विठ्ठल शिंदे,
इतर गावांतील प्रतिनिधी : विक्रम लक्ष्मणराव वाडेकर (अहिल्यानगर), अॅड. कल्याण दगडू बडे (छत्रपती संभाजीनगर), प्रसन्न साहेबराव दराडे (पुणे), श्रीकांत शिवकरण लाहोटी (पाथर्डी), ऋतिका अशोक कराळे (सांगवी खुर्द, ता. पाथर्डी).
या संपूर्ण कार्यवाहीचे मार्गदर्शन देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे यांनी केले असून संबंधित माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली. दरम्यान नव्या विश्वस्त मंडळाकडून देवस्थानातील विविध सोयीसुविधा वाढविणे, भक्तनिवास विकास, दर्शन व्यवस्थेतील सुधारणा, स्वच्छता व सुरक्षा उपाययोजना यांसारख्या सकारात्मक उपक्रमांची अंमलबजावणी होणार असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.




