Tuesday, October 22, 2024
Homeनगरश्री क्षेत्र मोहटादेवी गडावर उत्साहात घटस्थापना

श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर उत्साहात घटस्थापना

वाजत-गाजत देवीचा मुखवट्याची मिरवणूक || शारदीय नवरात्री उत्सवास सुरुवात

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

मोहटादेवी माता की जयच्या जयघोषात गुरुवारी भक्तांच्या साक्षीने मोहटादेवी गडावर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना देवस्थान समितीचे अध्यक्ष निरंजन नाईकवाडे यांच्याहस्ते करण्यात आली. सकाळी मोहटे गावातून देवीचा सोन्याच्या मुखवट्याची वाजत गाजत गडावर आणण्यात आला. तत्पूर्वी गावात महाआरती, दर्शन सोहळा आयोजित केला गेला. गावातील लोकांच्या दर्शनासाठी देवीचा सोन्याचा तांदळा (मुखवटा) ठेवण्यात आला. मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात झाली आहे. देवी मंदिर गाभार्‍यात मुख्य धार्मिक विधी देवस्थानच्या पुजार्‍यांच्या मंत्र उच्चारात पार पडला.

- Advertisement -

यावेळी दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त मयूर पवार, अ‍ॅड. कल्याण बडे, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, डॉ.श्रीधर देशमुख, शशिकांत दहिफळे, बाळासाहेब दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, डॉ.ज्योती देशमुख, विद्या पवार, संगीता बडे, पूजा वाडेकर, लता दहिफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे उपस्थित होते. घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या स्वयंभू मूर्तीवरती सोन्याचा मुकुट (तांदळा) देवीला नवीन साडी, सोन्याचा टोप, सोन्याचे अलंकार, देवीच्या नाकात नथ विविध प्रकारचे सोन्याचे आभूषण देवीला परिधान केल्याने देवीचे वेगळे रूप नवरात्रीमध्ये भक्तांना पाहावयास मिळते. येणार्‍या भक्तांसाठी देवस्थान समितीकडून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नवरात्रीच्या कालावधीत दैनंदिन कीर्तन, प्रवचन, भजन, जागर गोंधळ, हरिपाठ, सप्तशती पाठ, होमहवन असे कार्यक्रम गडावर होणार आहेत. भक्ताच्या नवसाला पावणारी मोहटादेवी संकटकाळी भक्ताच्या हाकेला ओ देते, अशी भावना देवी भक्तांमध्ये आहे. राज्यातून तसेच राज्य बाहेरून लाखो भाविक मोहटादेवीच्या दर्शनासाठी गडावर यात्रेसाठी येतात. भक्ताच्या भक्तीला प्रसन्न होऊन मोहटादेवी मोहटागडावर स्वयंभूस्थान आहे. माहूरच्या देवीचे अंशात्मक पीठ मोहटादेवीचं आहे. माहूरगड येथे देवीचेदर्शन घेण्यासाठी भक्तांचे अतिशय हाल होत असल्याने देवी भक्तांच्या भक्तीला पावन होऊन देवी मोहटादेवी गडावर प्रकट झाल्याची आख्यायीका आहे.

मोहटा देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी खाडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नवरात्र उत्सव काळासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटस्थापनेच्या दिवशी हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी येत होते. नवरात्र काळात मोहटादेवीच्या मंदिर गाभार्‍यातून व्हीआयपी दर्शन विश्वस्त मंडळांनी पूर्णतः बंद केले आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शनाचा आग्रह कोणत्याच भाविकांनी धरू नये असे, आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले.

नवरात्र काळात देवीच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा रूपाचे दर्शन घेण्याचे सौभाग्य भाविकांना लाभत आहे. नवरात्रात काळात चांदीचे पंचदेवता मंदिर गाभार्‍यात देवी समवेत स्थापित करण्यात येतात.देवस्थानचे वेदशास्त्रसंपन्न भूषण साखरे, भास्कर देशपांडे, नारायण सुलाखे, बाळासाहेब क्षीरसागर यांनी घटस्थापनेचे पौरोहित्य केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या