Monday, May 18, 2026
Homeमहाराष्ट्रMonsoon 2026 : मान्सून अंदमान-निकोबारच्या बेटांवर पोहोचला,महाराष्ट्रात कधीपर्यंत धडकणार?

Monsoon 2026 : मान्सून अंदमान-निकोबारच्या बेटांवर पोहोचला,महाराष्ट्रात कधीपर्यंत धडकणार?

मुंबई । Mumbai

उन्हामुळे अक्षरशः हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने अधिकृतरीत्या भारतात प्रवेश केला असून तो अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता देशभरातील नागरिकांचे लक्ष मान्सूनच्या पुढील प्रवासाकडे लागले आहे.

- Advertisement -

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनने अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. श्री विजय पुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली असून वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. सध्या या परिसरात ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने पश्चिमेकडील वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सून आणखी वेगाने पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यंदा मान्सून वेळेआधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. साधारणपणे 1 जूनला केरळात पोहोचणारा मान्सून यंदा 26 मे रोजीच केरळात दाखल होऊ शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनच्या हालचालींना वेग मिळाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतेही मोठे चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे येण्याची शक्यता कमी असून त्याची आगेकूच सुरळीत होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर 6 जूनपर्यंत कोकणात आणि 7 जूनपर्यंत पुणे परिसरात मान्सून दाखल होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीनेही ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.

दुसरीकडे, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि दक्षिण कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतातील अनेक भागांमध्ये अद्यापही उष्णतेची लाट कायम असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. एकूणच, मान्सूनच्या आगमनामुळे देशभरातील वातावरणात आशेची नवी चाहूल निर्माण झाली असून येत्या काही दिवसांत अनेक भागांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Crime News : जमिनीच्या वादातून अंगणवाडी मदतनीस महिला कर्मचाऱ्याला पती अन्...

0
पारनेर । तालुका प्रतिनिधी पती-पत्नीच्या नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे उघडकीस आली आहे. जमिनीच्या जुन्या वादातून एका ५२...