लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon
येत्या आठवडाभरात केंद्र व राज्य सरकारने (Central and State Government) कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव जाहीर करावा. तसेच बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या कांद्याला १५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय जाहीर न केल्यास दि.२६ रोजी चांदवड (Chandwad) येथे मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिला. कांद्याला मातीमोल भाव देऊन बळीराजाला उद्ध्वस्त करणाऱ्या शेतकरी विरोधी सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी आणि शेतमालाला हमीभाव व विक्री झालेल्या कांद्याला अनुदान मिळावा या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे आमदार रोहित पवार यांनी लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
हे देखील वाचा : Nashik Onion Issue News : कवडीमोल भावात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना किलोमागे १५ ते २० रुपये अनुदान द्या – आमदार रोहित पवारांची मागणी
यावेळी खासदार भास्कर भगरे, खासदार निलेश लंके, यांनी केंद्र सरकारच्या निर्यात धोरण व शेतकरी विरोधी निर्णयावर टिका केली. लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Market Committee) शेतकरी एल्गार आंदोलनाचे रणशिंग फुंकताना लढा केवळ कांद्याच्या भावाचा नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी शेतकर्यांना सवाल विचारला. ते म्हणाले की, सध्या बाजार समितीत कांद्याला मिळणारे भाव परवडणारे आहेत का? त्यामध्ये उत्पादन खर्च निघतो का? असा प्रश्न विचारला. तसेच मजूरी, खते, बियाणे, खर्चात वाढ झालेली आहे का? विधानसभेच्या निवडणूकीआधी २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री असताना कांद्याला एक भाव २४०० रुपये देण्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते आणि आज मुख्यमंत्री असताना चक्क १२३५ रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला तो मान्य आहे का? असे विचारले असता शेतकर्यांनी अमान्य असल्याच्या जोरदार घोषणा दिल्या.
दरम्यान, शेतकऱ्यांना (Farmer) उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा अशा जोरदार घोषणा देत बाजार समितीच्या प्रवेशद्वारापासून शेतकर्यांनी ट्रॅक्टरवर आमदार रोहित पवार, खा. भगरे खा. लंके, माजी आमदार सुनील भुसारा यांना बसून बाजार समिती आवारात कांदा लिलाव स्थळी आणले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव शिंदे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, सोनिया होळकर, जयदत्त होळकर, ललित दरेकर, व्यापारी सदस्य प्रवीण कदम, बाळासाहेब दराडे, छबूराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, महेश पठारे रमेश पालवे यांसह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.




