Friday, October 2, 2026
HomeनगरCrime News : जमिनीच्या वादातून अंगणवाडी मदतनीस महिला कर्मचाऱ्याला पती अन् सावत्र...

Crime News : जमिनीच्या वादातून अंगणवाडी मदतनीस महिला कर्मचाऱ्याला पती अन् सावत्र मुलाकडून निर्घृण मारहाण

पारनेर । तालुका प्रतिनिधी

पती-पत्नीच्या नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे उघडकीस आली आहे. जमिनीच्या जुन्या वादातून एका ५२ वर्षीय अंगणवाडी मदतनीस महिलेला तिच्याच पतीने, सावत्र मुलाने आणि पुतण्याने शेतात घुसून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने निर्घृण मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संगिता बाबाजी जांभळकर (वय ५२) यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथील हराळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगिता जांभळकर या वडगाव सावताळ येथे एकट्या राहून भोंद्र येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचे पती बाबाजी जांभळकर यांनी दुसरे लग्न केले असून ते वेगळे राहतात. पतीने संगिता यांना उदरनिर्वाहासाठी दीड एकर जमीन दिली आहे, तर उर्वरित जमिनीचा वाद सध्या कोर्टात सुरू आहे. याच वादाची परिणिती या भयंकर हल्ल्यात झाली.

१४ मे रोजी दुपारी संगिता शेतात असताना, पती बाबाजी, सावत्र मुलगा राहुल, पुतण्या शैलेश आणि त्याचा एक अनोळखी मित्र ट्रॅक्टर घेऊन तिथे आले. त्यांनी संगिता यांच्या ताब्यातील जमीन बळजबरीने नांगरण्यास सुरुवात केली. संगिता यांनी याला विरोध केला असता, चौघांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. राहुलने लाकडी दांडक्याने तर शैलेशने लोखंडी हत्याराने त्यांच्यावर सपासप वार केले. इतकेच नव्हे तर, मारहाण सुरू असताना संशयितांनी संगिता यांचा मोबाईल आणि गळ्यातील सोन्याचे पोत जबरदस्तीने हिसकावून घेतले व ‘गाव सोडले नाही तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली.

या जीवघेण्या हल्ल्यात संगिता गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी पीडित महिलेच्या जबाबानुसार पतीसह चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. एका महिलेवर झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....