नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
भारतामध्ये सध्या हवामानाची (IMD) संमिश्र स्थिती पाहायला मिळत आहे. पूर्व भाग वगळता देशातील बहुतांश भागांत पावसाने ओढ दिली आहे. दक्षिण-पश्चिम मान्सून (नैऋत्य मोसमी वारे) तात्पुरता कमकुवत झाला आहे, परंतु हवामान तज्ज्ञांच्या मते, पश्चिम पॅसिफिक महासागरात तयार होत असलेल्या अनेक हवामान प्रणाली अनुकूल स्थितीत आहेत. या प्रणाली बंगालच्या उपसागरात दाखल झाल्या, तर १८ ते २५ जुलै दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो.
हवामान तज्ज्ञ आगामी आठवड्यात या बदलत्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. मान्सूनची सुरुवात सामान्य झाली असली तरी, त्यानंतर मध्य आणि उत्तर भारताच्या मोठ्या भागात तो कमकुवत झाला. पूर्व भारतात सतत पाऊस पडत असताना पश्चिम, उत्तर आणि मध्य भागात मात्र पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (India Meteorological Department) मते, मान्सूनचा आस त्याच्या मूळ स्थितीवरून सरकल्यामुळे या भागांत बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रवाह खंडित झाला आहे.
पश्चिम पॅसिफिकमध्ये काही उष्णकटिबंधीय प्रणाली तयार होत असून, त्या बंगालच्या उपसागरात आल्यास दक्षिण पश्चिम मान्सून बळकट होईल. हवामान तज्ज्ञांच्या मते, १८ ते २५ जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जर पॅसिफिकमधील प्रणाली बंगालच्या उपसागरात प्रवेश करतील, तर खालच्या स्तरावरील चारे अधिक तीव्र होतील आणि मान्सूनचा आस पुन्हा त्याच्या मूळ जागेवर येईल. यामुळे राजस्थान आणि गुजरातसह मध्य आणि उत्तर भारतात (Uttar India) सर्वदूर चांगला पाऊस पडू शकतो.
पावसाची असमान विभागणी
देशभरात पावसाचे प्रमाण असमान आहे. आयएम डीचे शास्त्रज्ञ शशी कांत यांनी सांगितले की, बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, केरळ, पंजाब, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालैंड आणि गोवा या राज्यांमध्ये अजूनही पावसाची मोठी तूट कायम आहे. आगामी आठवड्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांसह इंडो-गंगेच्या मैदानी भागात मुसळधार ले अतिमुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे, त्याच वेळी, दिल्ली, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.




