Thursday, September 12, 2024
Homeअग्रलेखआनंदाचे डोही आनंद तरंग...

आनंदाचे डोही आनंद तरंग…

म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान..अशी गो.ब. देवल यांची रचना आहे. ते सिद्ध करणाऱ्या अनेक करामती ज्येष्ठ मंडळी करतात. मुलुंडचे शरद कुलकर्णी हे त्यापैकी एक. वयाच्या साठीनंतर त्यांनी माउंट एव्हरेस्ट एकदा नव्हे दोनदा सर केले. असा पराक्रम गाजवणारे ते सर्वात वयस्कर भारतीय ठरले.

वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी गिर्यारोहणाला सुरुवात केली. अन्य काही उंच शिखरांच्या मोहीमा देखील त्यांनी यशस्वी केल्या आहेत. डहाणू येथील एक आजी वयाच्या ६७व्या वर्षी व्यावसायिक बनल्या. त्या सुकवलेल्या फळांचा व्यवसाय करतात. चंद्रो तोमर या साठाव्या वर्षी नेमबाजी शिकल्या होत्या. त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यांच्या सुनांना देखील त्यांनी बंदूक चालवायला शिकवले होते. देशाच्या कानाकोपऱ्यात असे अनेक आजीआजोबा असतील. त्यांची वाटचाल आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रेरणादायी आहे. वयाच्या साठीनंतर कोणतीही नवी गोष्ट शिकणे अथवा नवी सुरुवात करणे म्हणजे येरागबाळाचे काम नोहे. निवृत्तीपूर्वी माणसे त्यांच्या दिनचर्येत व्यस्त असतात. त्यांचे दिवसाचे वेळापत्रक ठरलेले असते. तथापि निवृत्तीच्या क्षणापासून त्यांचे आयुष्य बदलून जाते. रिकामपण आल्याची भावना मानत निर्माण होते. बिनकामाचे झाल्याची भीती सतावते. निवृत्तीनंतर माणसांनी त्यांना क्रियाशील ठेवले नाही तर जडत्व येते, नकारात्मक भावना निर्माण होतात. त्यामुळे मन आजारी पडू शकते. अनेक व्याधी जडण्याचा धोका वाढतो असे निष्कर्ष अनेक अभ्यासकांनी नोंदवले आहेत. तसे होऊ द्यायचे नसेल तर ज्येष्ठानी क्रियाशील राहायला हवे. वर उल्लेखिलेली उदाहरणे हा त्याचा चपखल नमुना. व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हंटले जाते. तद्वत प्रत्येकाची क्रियाशीलता भिन्न असू शकते. जी ज्याची त्याला शोधता आली पाहिजे. एकाने डोंगर चढला म्हणजे दुसऱ्याला तो चढता येईलच असे नाही. आजींना खेळ जमला ते कौशल्य सर्वानाच साढेक से नाही. ज्याच्या त्याच्या प्रकृतीला झेपेल अशी क्षेत्रे शोधता येतात. त्यात मन रमवता येऊ शकते. डोळ्यासमोर ध्येय ठेवले तर ते साध्य करण्यासाठी माणसे खटपट करतात. बागकाम, नातवंडांचे संगोपन, घरातील छोटी छोटी कामे करणे, पाळीव प्राण्यांची काळजी घेणे, छोट्या मुलांना जमवून त्यांना मूल्य रुजवणाऱ्या गोष्टी सांगणे अशा छोट्या छोट्या कृतींमधून क्रियाशीलता अनुभवता येते. त्यात मन रमते. नकारात्मकता लांब राहाते. सकारात्मक भावना निर्माण होतात. आजार दूर पळतात. स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. दिनचर्या नियमित करण्याची आणि आपला त्रास कोणालाही होऊ नये अशी इच्छा प्रबळ होते. आरोग्यम धनसंपदा यातील मर्म उमगते. असे झाले तर आयुष्याचा दुसरा डाव देखील रंगतो. जसा वर उल्लेखिलेल्या सर्वांचा रंगला. आनंदाचे डोही आनंद तरंग याची अनुभूती येते. फक्त त्यासाठी आनंदाच्या डोहात डोकावण्याची आणि ज्याचा त्याचा आनंद शोधण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या