मुंबई | Mumbai
दिल्लीत होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काल (मंगळवारी) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ‘महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलतांना ‘हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार नाही तर त्यांनी जणू अमित शहा यांचा सत्कार केला आहे असं आम्ही मानतो’, असे म्हणत शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता राऊतांच्या या टीकेला शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी कोल्हे म्हणाले की,”संजय राऊत यांची ही वैयक्तिक भूमिका असू शकते. दिल्लीत जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे, त्या अंतर्गत हा कार्यक्रम होता. या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः शरद पवार साहेब आहेत. या साहित्य संमेलनात काही मंडळी काम करत असताना त्यांच्या मागे शरद पवार साहेब स्वागताध्यक्ष म्हणुन खंबीरपणे उभे आहेत. किंबहुना यात कुठलेही राजकारण न आणता स्टेट्समनशीपचा आदर्श पवार साहेबांनी घालून दिला, हे मला महत्वाचं वाटतं”, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,”दलालांचं संमेलन म्हणण्यामागे राऊतांना काय वेगळी माहिती आहे का, हे मला ठाऊक नाही. पण मी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथल्या मराठी भाषिकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. ही भावना मला महत्त्वाची वाटते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM) असताना कसोशीने प्रयत्न केल्याचे मला समजलं. त्यामुळे ही कृतज्ञतेची भावना असू शकते,” असेही खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी ‘तुमचं दिल्लीतील राजकारण वेगळं असेल. मात्र, आम्हालाही राजकारण कळतं’, असं शरद पवारांना उद्देशून म्हटले होते. त्यावरही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की,”हे उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखं आहे. शरद पवारसाहेबांच्या राजकारणाविषयी बोलण्याची फार कमी जणांची उंची आहे. शरद पवारांना किती राजकारण (Political) कळतं हे कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की राजकारणात सुसंस्कृतपणा जपला पाहिजे”, असे खासदार कोल्हे यांनी म्हटले.