Sunday, November 3, 2024
Homeनाशिकपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी; खा. भगरेंची...

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी; खा. भगरेंची केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे मागणी

दिंडोरी | प्रतिनिधी
दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहाण यांची भेट घेत त्यांना पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणार्‍या दिंडोरी, देवळा, निफाड, चांदवड, नांदगाव व जिल्हयातील क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसांमध्ये अतिवृष्टी होऊन मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये शेतकर्‍यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे पशुधनाचे व शेतीचे तसेच इतर वित्तहानी झाली आहे.दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ तालुक्यात भात, नागली, वरई पिकांचेही मोठठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्याचप्रमाणे द्राक्षबागा व इतर शेतीपिकांचे अवकाळी पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. रोज पाऊस पडत असल्यामुळे द्राक्ष, टोमॅटो, वेलवर्णी पिकांसह सर्व भाजीपाला पिकांच्या रासायनिक औषधाच्या फवारणीचा खर्च वाढताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी पुर्णत: आर्थिक कोंडीत सापडला आहे.

त्याचबरोबर हनुमंतपाडा ता. देवळा येथे मनुष्य देखील वाहून गेल्याचे व मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली असून अजूनही पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही व परिसरात शेतीचे नुकसान किती झाले हे अजून देखील कळायला मार्ग नाही, याचा अंदाज घेत दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी ताबडतोब दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये झालेल्या नुकसानीचे संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ या गोष्टीवर गांभीर्याने विचार करून पंचनामा तसेच पिक विमाच्या अधिकार्‍यांना निर्देश देण्याच्या सूचना करण्यासाठी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या