राहाता |वार्ताहर| Rahata
गुन्हेगारीवर वचक न राहिल्याने राहाता परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीची वाढ होत चालल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला. परिणामी राहाता पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गावांमध्ये अवैधरित्या गुटखा, दारू, जुगार, वाळूतस्करी, दुचाकी, गंठण व मोबाईल चोरी याबरोबरच ओंकार गायकवाड यांच्या अपघातास कारणीभूत असलेल्या आरोपींना तात्काळ अटक न केल्याच्या निषेधार्थ राहाता ग्रामस्थांनी मोर्चा काढून पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या अकार्यक्षम पद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्या बदलीची मागणी केल्याने अखेर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे.
यासंदर्भात शालिनीताई विखे पाटील, डॉ. राजेंद्र पिपाडा, नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी देखील चव्हाण यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांच्या बदलीची मागणी केल्याने अखेर बुधवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. राहात्यात अनेक वर्षापासून पोलीस अधिकारी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत नाही. यामागचे काय कोडे आहे हे अद्याप शहरातील ग्रामस्थांना समजले नाही. अनिल सांडभोर, देविदास पवार, सुरेश वर्हाडे, कैलास वाघ व रणजीत गलांडे असे काही अपवाद वगळता कुठल्याही पोलीस निरीक्षकाने शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत गेली.
नितीन चव्हाण यांची राहात्यात आल्यानंतर तेट गुन्हेगारी नक्कीच मोडीत काढतील अशी ग्रामस्थांची भावना होती. परंतु तसे झाले नाही. याउलट अवैधरित्या व्यवसाय, घरफोडी, दुचाकी व गंठण चोरी याबरोबरच टारगट तरुणांचा विद्यार्थिनी व महिलांना होणारा त्रास वाढत गेल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाल्याचे दिसून आले. कुठलीही फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना योग्य प्रकारची वागणूक दिली जात नव्हती. साधी एनसी दाखल करण्यासाठी आठ ते दहा तास पोलीस ठाण्यात बसून ठेवून जणू काही त्यांनीच अपराध केला, असे त्यांना जाणवायचे यामुळे नागरिक फिर्याद देण्यास जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे नागरिक देखील पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या कामकाजावर नाराज होते. त्यातच सात दिवसापूर्वी ओंकार गायकवाड या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धडक दिलेल्या वाहनाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले होते. त्या अनुषंगाने त्या वाहन चालकावर कारवाई करा अशी मागणी नातेवाईकांनी करून देखील पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी या घटनेचे गांभीर्य घेतले नाही.
परिणामी ओमकारचा मृत्यूनंतर त्याचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणून ठिय्या आंदोलन करत पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी केली. शालिनीताई विखे पाटील व डॉ राजेंद्र पिंपळा यांना देखील गायकवाड कुटुंबियांनी मुलीच निरीक्षक चव्हाण यांनी या घटनेचे गांभीर्य घेतले नाही. डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चव्हाण यांच्या बदलीची मागणी केली. नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी देखील पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे चव्हाण यांच्या बदलीची मागणी केली होती. या सर्व घडामोडींचे गांभीर्य लक्षात घेत अखेर त्यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश बुधवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी गुन्हेगारावर वचक न ठेवल्यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था बिघडली. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सरोदे यांनी शहराची कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत. तसेच पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांची नगरपरिषदेच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन त्यांना शहराच्या वाढत असलेल्या गुन्हेगारी बाबत माहिती दिली. त्या अनुषंगाने त्यांनी याबाबत कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
– कैलास सदाफळ, माजी नगराध्यक्ष




