नाशिक | प्रतिनिधी | Nashik
संयुक्त राष्ट्रांच्या (United Nation) ८१ व्या आमसभेसाठी न्यूयॉर्क येथे असलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांच्याशी संवाद साधावा आणि प्रश्नांवर तातडीने समाधानकारक तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. वाजे यांनी विद्यार्थ्यांनाही स्वतंत्र पत्र पाठवून त्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा व्यक्त केला आहे.
MPSC च्या परीक्षा आणि भरती प्रक्रियेशी संबंधित विविध प्रश्नांवर पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, पेपरफुटीच्या प्रकरणांवरील कारवाई, भरती प्रक्रिया आणि आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता असल्याचे वाजे यांनी पत्रात नमूद केले आहे.
शासनाने यापूर्वी विद्यार्थ्यांच्या काही मागण्यांबाबत (Demands) सकारात्मक भूमिका घेतली असेल, तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्ट आणि कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा. तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवेदनशीलतेने संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी वाजे यांनी केली आहे. पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची इच्छा होती.
मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या निमित्ताने आपण सध्या न्यूयॉर्कमध्ये असल्याने ते शक्य झाले नाही, असे वाजे यांनी विद्यार्थ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.विद्यार्थ्यांचा संघर्ष हा केवळ आंदोलनापुरता मर्यादित नसून त्यांच्या भविष्यासाठीचा लढा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शांततामय, संयमी आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून आपला लढा पुढे न्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शासनानेही या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित महत्त्वाचा प्रश्न म्हणून पाहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गुणवत्तावान अधिकारी मिळणे राज्याची गरज
MPSCच्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनात सक्षम, गुणवत्ताधारक, संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी घडतात. त्यासाठी विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम, आर्थिक गुंतवणूक आणि मानसिक तयारी करतात. त्यामुळे परीक्षा व भरती प्रक्रियेत पारदर्शकता, निश्चितता आणि स्पष्टता असणे आवश्यक आहे, असे वाजे यांनी म्हटले आहे. दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर काही मागण्यांबाबत निर्णय व आश्वासने देण्यात आली होती. त्यात परीक्षा ऑफलाइन घेणे, पुढील तीन वर्षांच्या रिक्त पदांचे नियोजन, सुमारे ७० हजार पदभरती आणि सिंगल कार्ड प्रणाली यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यानंतरही पुण्यात आंदोलन सुरू राहिले असून MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांवरून आंदोलन सुरू आहे.
MPSCची तयारी करणारे विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम, आर्थिक गुंतवणूक आणि मानसिक संघर्षातून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता, त्यांच्या भविष्याशी निगडित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणून शासनाने संवेदनशीलतेने विचार करावा. विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तातडीने आणि समाधानकारक तोडगा काढावा, ही माझी मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रहाची विनंती आहे.
राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक




