मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपविरोधात सामना करण्यासाठी तयार झालेली इंडिया आघाडी दिल्ली विधानसभा निवडणुकीत बिघडताना दिसत आहे. दिल्ली विधानसभा आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत.तर इंडिया आघाडीत असूनही काँग्रेस आणि ‘आप’ने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीत महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपला पाठिंबा आम आदमी पक्षाला जाहीर केला केल्याचे खासदार अनिल देसाई (MP Anil Desai) यांनी सांगितले आहे. तर संजय राऊत यांनी मात्र पाठिंब्याचा निर्णय बाकी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे गटात दिल्ली विधानसभा निवडणुकीत कुणला पाठिंबा द्यायचा, यावरुन मतभेद दिसत आहे.
ठाकरेंच्या या निर्णयामुळे काँग्रेसला (Congress) धक्का बसल्याचे समजले जात आहे. तसेच या निर्णयामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षात मतविभागणी होण्याची शक्यता आहे. तर, दिल्लीत मतांची विभागणी होणार नाही आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरोधात निवडणूक लढवतील, अशी अपेक्षा अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी एका माध्यमाशी बोलतांना “दिल्लीत उद्धव ठाकरेंनी आम आदमी पक्षाला समर्थन दिले आहे. कारण लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी महाराष्ट्रात ‘आप’ने ठाकरेंना पाठिंबा दिला होता. दिल्लीत काँग्रेस-आप स्वतंत्र लढत असल्यामुळे मतविभाजन होऊ नये,असे वाटते. यासाठी दोघांनी समन्वय राखायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तर दुसरीकडे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीत कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत निर्णय झाला नसल्याचं म्हटले होते. तसेच काँग्रेस देशात मोठा पक्ष आहे, मात्र दिल्लीत आप मोठा पक्ष आहे. अरविंद केजरीवाल यांची ताकद जास्त आहे. तिथे आप निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणार असे चित्र आहे. परंतु, काँग्रेस-आप इंडिया आघाडीत असूनही वेगवेगळे लढत आहेत याचं आम्हाला दुःख आहे. निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढणं वेगळी गोष्ट, मात्र केजरीवालांवर आरोप नको. एकत्र लढले असते तर आनंद झाला असता. मात्र दिल्लीत कुणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत आमचा अजून निर्णय झालेला नाही, आम्ही द्विधा मनस्थितीत आहोत, असे त्यांनी म्हटले.