मुंबई | Mumbai
आपण सच्चे गृहमंत्री असाल, तर या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा. त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे. बीडमध्ये कोण आहेत? तुमची पोर आहेत की जावई आहेत का? ज्यांना अभय दिले जात आहे, असा सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“बीडमधले चित्र अत्यंत गंभीर आहे. लवकरच उद्धव ठाकरे परभणी, बीडला जातील. बीडमधला प्रकार हा बिहारमधल्या अनेक जिल्हयात अशा प्रकारचा दहशतवाद चालायचा. अपहरण, खंडण्या, राजकीय हत्या, मग राजकीय हत्या करणाऱ्याला संरक्षण असे बिहराच चित्र होते. हे चित्र तुम्हाला बीड, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात दिसतय” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “फडणवीसांना आज मी व्हिडिओ पाठवलाय. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तो पहावा. बीडमध्ये गेल्या काही वर्षात ज्या हत्या केल्या आहेत, त्या हत्यांमागे कोण आहे? कोणा-कोणाच्या हत्या झाल्या? त्या हत्या दाबल्या गेल्या. त्याची माहिती एका व्यक्तीने दिलीय. मी तो व्हिडिओ सोशल माध्यमातून लाडके मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवला आहे” असे संजय राऊत म्हणाले.
त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता
“आपण सच्चे गृहमंत्री असाल, तर या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा. त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे. बीडमध्ये कोण आहेत? तुमची पोर आहेत की जावई आहेत का? ज्यांना अभय दिले जातय. बीडमध्ये गेल्या काही वर्षात ३८ हत्या झाल्या आहेत. या ३८ हत्या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यातले बहुतांश वंजारी समाजाचे आहेत. २९ तारखेला तिथे एक मोर्चा निघतोय, त्या मोर्चाला राजकीय स्वरुप देता येणार नाही, हा पीडितांचा मोर्चा आहे. संतोष देशमुखच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा. बीडमधला अर्बन नक्षलवाद संपवा तो त्यांचा आवडता शब्द आहे” असे संजय राऊत म्हणाले.
त्यांनी खोटं बोलणं थांबवलं पाहिजे
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खोटे बोलणे थांबवले पाहिजे. विरोधकांचा काटा काढण्यासाठी तुमच्याकडे गृहमंत्रिपद नाही. तसेच सहकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर पांघरुण घालण्यासाठी हे पद मिळालेले नाही. लाडक्या बहिणींचे देवाभाऊ आहात ना? मग परळी आणि आसपासच्या परिसरातल्या लाडक्या बहिणींचे कुंकू पुसले गेले आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे लाडक्या देवाभाऊंनी लाडक्या बहिणी ज्या विधवा झाल्या आहेत तर कायद्याने या सगळ्याचा बदला घेतला पाहिजे. असे राऊत म्हणाले.
तुमचे लाडके भाऊ आहेत की जावई आहेत?
३८ पेक्षा जास्त लाडक्या बहिणींचे कुंकू पुसले गेले आहे हे देवेंद्र फडणवीसांना माहीत नाही का? बाकी त्यांना सगळे माहीत असते. आमचे फोन ते टॅप करतात. विरोधकांची माहिती घेतात, पक्ष फोडतात. वेशांतर करुन पक्ष फोडतात. वेशांतर करुन त्यांनी बीड आणि परभणीत फिरले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले त्यावर धनंजय मुंडेंना कुणाचा राजकीय आशीर्वाद आहे असे विचारले असता संजय राऊत म्हणाले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा आशीर्वाद धनंजय मुंडेंना आहे. आशीर्वाद का दिला आहे ते त्या दोघांनी सांगावे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचा राजीनामा घेतला पाहिजे. हे राज्य कुठल्या दिशेला तुम्ही घेऊन जात आहात? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, अमित शाह यांना हे सगळे दिसत नाही का? महाराष्ट्रातले राज्य असे चालले होते का? ज्यांना आशीर्वाद दिला आहे ते तुमचे लाडके भाऊ आहेत की जावई आहेत?