Thursday, April 23, 2026
Homeशैक्षणिकMPSC Exam : ‘एमपीएससी’च्या उत्तरतालिकेवरून उमेदवारांमध्ये संताप

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या उत्तरतालिकेवरून उमेदवारांमध्ये संताप

पुणे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षेच्या अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध होताच विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे. आयोगाने या परीक्षेत एकूण १२ प्रश्न बाद केले असून, २ प्रश्नांची उत्तरे बदलली आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम सुमारे १४ प्रश्नांवर व उमेदवारांच्या २८ गुणांवर होणार असल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांत एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये वारंवार चुका होत असल्याने आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०२४ च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतही २० प्रश्न रद्द झाले होते, तर १३ प्रश्नांची उत्तरे बदलण्यात आली होती. अशा प्रकारच्या घडामोडींमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळीत होत असल्याचे दिसून येत आहे.

या प्रश्नांमध्ये मुख्यत्वे भाषांतरातील त्रुटी आणि शुद्धलेखनाच्या चुका आढळल्या आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही प्रश्नपत्रिकांमध्ये दर्जाहीन भाषांतर दिसून आल्याची टीका होत आहे. काही प्रश्न तर गुगल ट्रान्सलेटरसारख्या साधनांद्वारे तयार केले असल्याची शंका उमेदवारांनी व्यक्त केली आहे. यामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

यूपीएससी आपला निकाल अवघ्या २० दिवसांत जाहीर करते, तर एमपीएससीला ही प्रक्रिया पूर्ण करायला दोन महिने किंवा त्याहून अधिक काळ लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील तयारीवर थेट परिणाम होतो. दरम्यान, आयोगाने सर्व प्रश्न तज्ज्ञांकडून तयार केले जातात आणि विद्यार्थ्यांच्या आक्षेपांची शहानिशा करूनच अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाते, असे सांगितले आहे. तसेच, शुद्धलेखन व भाषांतराच्या त्रुटी टाळण्यासाठी सुधारणा सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे.

तथापि, उमेदवारांचा आयोगावरील विश्वास डळमळीत झाला असून, त्यांनी राज्य सरकारकडे परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक व विद्यार्थीहिताचे करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गुरुवारी सकाळी...