
मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न आणि औषध निरीक्षक पदभरतीच्या पेपरफुटी प्रकरणात आयोगातील तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी रविवारी एक्स या समाज माध्यमातून केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
एमपीएससीच्या पेपरफुटीची मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी आयोगाचे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे आणि अवर सचिव अभिजित लेंडवे यांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यापैकी भीमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्य हे राजकीय संपर्क विरहित असणारेच असावेत तर सचिव हा मंत्रालय कॅडरचा नियुक्त न करता वरिष्ठ आयएएस दर्जाचाच अधिकारी असला पाहिजे, अशी भूमिकाही कडू यांनी मांडली आहे.
आयोगाच्या सध्याच्या सहसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांच्या प्रतिनियुक्तीसाठी आयोगाची मान्यता नसताना परस्पर मनमानीपणे मंत्रालयातील अधिकारी एकतर्फी आयोगात पाठविण्याच्या तक्रारीची सखोल चौकशी करावी. सदर पदावरील व्यक्तीची नियुक्ती नियमबाह्य असल्याने ती तात्काळ रद्द करावी. प्रश्नफुटी संदर्भात प्राथमिक जबाबदारी परीक्षा नियंत्रक यांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशा मागण्या कडू यांनी केल्या आहेत. गरज पडली तर विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई देखील लढू. पण विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम नक्की करू, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.




