अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून मिळविलेली रक्कम बँक खात्यांमध्ये स्वीकारून ती तातडीने चेक व एटीएमव्दारे काढून घेणार्या तथाकथित ‘म्युल अकाउंट’धारक व्यक्ती विरोधात येथील सायबर पोलीस ठाण्यात आणखी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी 10 व्यक्तींविरूध्द एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, बुधवारी (29 जुलै) दाखल झालेल्या या दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण 14 लाख 49 हजार 800 रूपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा समावेश असून, अज्ञात बँक खातेधारक, खाते हाताळणारे तसेच त्यांच्या साथीदारांविरूध्द गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलीस अंमलदार सोमनाथ आठरे यांनी याप्रकरणी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार, देशभरातील नागरिकांची विविध प्रकारे सायबर फसवणूक करून मिळविलेली रक्कम अहिल्यानगर जिल्ह्यातील काही बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली. त्यानंतर संबंधित खातेधारक अथवा खाती हाताळणार्या व्यक्तींनी ही रक्कम तातडीने चेक किंवा एटीएमव्दारे काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे तपासात समोर आले आहे.
सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संबंधित खातेधारकांचा मुख्य सायबर गुन्हेगारांशी संगनमत असल्याचा संशय असून, त्यांनी जाणीवपूर्वक आपली बँक खाती प्रत्यक्ष किंवा एजंटमार्फत फसवणुकीच्या रकमेसाठी वापरण्यास दिली असावीत. त्यामुळे या सर्वांनी कट रचून संघटितपणे नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.




