मुंबई । Mumbai
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असतानाच भुलेश्वर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली आहे. प्रसिद्ध ‘भुलेश्वरचा राजा’ या सार्वजनिक गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान श्रींची भव्य मूर्ती अचानक खाली कोसळली. या भीषण अपघातात दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन लहान मुलींसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण भुलेश्वर परिसरावर आणि गणेशभक्तांवर शोककळा पसरली आहे.
शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भुलेश्वर येथील बलराम मर्चेंट रोडवर असलेल्या कबुतरखान्याजवळील जय अंबे चौकात ही घटना घडली. ढोल-ताशांचा गजरात, गुलालाची उधळण आणि भक्तांच्या जयघोषात ‘भुलेश्वरचा राजा’ आपल्या मंडपाच्या दिशेने मार्गस्थ होत होता. अचानक मिरवणूक जय अंबे चौकात आली असताना श्रींची भव्य मूर्ती एका बाजूला झुकली आणि थेट रस्त्यावर कोसळली. क्षणार्धात आनंदाचे वातावरण किंकाळ्या आणि पळापळीत बदलले. मूर्तीखाली काही भाविक दबले गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि पालिकेच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मूर्तीखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी संकेत नेवशे (३३) आणि बृजेश हेमंत जोशी (३०) या दोघांना तपासून मृत घोषित केले. या दुर्घटनेत ५ आणि ७ वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वैभव घेनंद (३८), पवन चौरसिया (२५), लावण्या गनेर (५), दिव्या गनेर (७) आणि कुणाल काशिद (२६) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर जवळच असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईत गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून लवकरच गणेश चतुर्थी साजरी होत आहे. महापालिकेकडून यंदा हजारो मंडपांना मंजुरी देण्यात आली असून शहरभरात आगमनाच्या भव्य मिरवणुका निघत आहेत. मात्र, भुलेश्वर येथील या दुर्दैवी घटनेने मोठ्या आणि वजनदार मूर्तींच्या वाहतुकीदरम्यान पाळायच्या सुरक्षेच्या नियमांचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आणला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.




