Thursday, June 18, 2026
Homeमहाराष्ट्रDrug Overdose : मुंबई हादरली! गोरेगावमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा...

Drug Overdose : मुंबई हादरली! गोरेगावमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबई । Mumbai

मुंबईतील गोरेगाव परिसरात आयोजित एका हाय-प्रोफाइल म्युझिक कॉन्सर्टला गालबोट लागले असून, ड्रग्जच्या अतिसेवनाने दोन तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोरेगाव पूर्वेकडील नेस्को (NESCO) संकुलात ही धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे शहरात ड्रग्जच्या वाढत्या विळख्याबाबत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नेस्को संकुलातील हॉल क्रमांक ४ मध्ये ११ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता एका मोठ्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील सुमारे ३ ते ४ हजार तरुण-तरुणींनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्री कॉन्सर्ट संपल्यानंतर एका ‘आफ्टर पार्टी’चेही आयोजन करण्यात आले होते, जी पहाटेपर्यंत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याच दरम्यान काही तरुणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे समजते.

या कॉन्सर्टसाठी आयोजकांनी विविध श्रेणींचे महागडे तिकीट दर निश्चित केले होते. यामध्ये सामान्य प्रवेशासाठी १५०० रुपये, तर व्हीआयपी पाससाठी २५०० रुपयांपर्यंत दर होते. विशेष म्हणजे, बॅकस्टेज प्रवेशासाठी ६००० रुपये आणि व्हीआयपी टेबल्ससाठी १ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंतची अव्वाच्या सव्वा फी आकारली जात होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल आणि सुरक्षा व्यवस्था असतानाही कार्यक्रमात ड्रग्ज पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दुर्दैवी घटनेत प्राण गमावणारे दोघेही नामांकित महाविद्यालयातील एमबीएचे शिक्षण घेत होते. ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना तातडीने जोगेश्वरी येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

वनराई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू केला आहे. कॉन्सर्टच्या ठिकाणी ड्रग्ज नक्की कोठून आले, आयोजकांनी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती का, आणि यामागे कोणते मोठे ड्रग्ज रॅकेट कार्यरत आहे का, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. कॉलेज विश्वात या घटनेमुळे तीव्र शोक व्यक्त केला जात असून पालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात ९९.०२ टक्के मतदान

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी...