अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लग्नाचे आश्वासन देऊन वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची फिर्याद मुंबईतील 21 वर्षीय युवतीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून केडगाव येथील संदेश संजय क्षेत्रे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित युवती मुंबईतील मालाड परिसरात वडील व भावांसोबत राहते. सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी ती आईसोबत नगरमधील आलमगीर येथे आली असताना तिची क्षेत्रे याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले. मोबाईलवरून नियमित बोलणे सुरू झाल्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांनी लग्न करण्याचेही ठरविले होते, असे युवतीने फिर्यादीत म्हटले आहे.
2025 मध्ये संदेश याने फोन करून युवतीला भेटण्यासाठी केडगाव येथे बोलावले. त्यावेळी त्याने स्वतःच्या खोलीवर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप युवतीने केला आहे. त्यानंतरही संदेश याने वेळोवेळी तिला केडगाव येथे बोलावून घेतले आणि लग्नाचे आश्वासन देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. युवतीने विरोध केला असता, आपण लग्न करणार असल्याचे सांगून तो तिला विश्वास देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, संदेश याने युवतीची त्याच्या आई-वडिलांशी भेट घालून दिली होती. त्यामुळे लग्न होईल, अशी अपेक्षा युवतीला होती. मात्र, लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर संदेश याच्याकडून टाळाटाळ होऊ लागली.
त्यानंतर त्याने घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याचे सांगत लग्न करण्यास नकार दिला आणि यापुढे फोन करू नको, असे सांगून संपर्क तोडल्याचे युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. 20 ऑक्टोबर रोजी संदेश याने फोन करून युवतीला नगर येथे बोलावले. पुणे बसस्थानक येथे भेट झाल्यानंतर युवतीने लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे मानसिक त्रास झाल्यानंतर तरुणी शिर्डी येथे मैत्रिणीकडे गेली. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी तिने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.




