अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसणे, बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार परवाना नूतनीकरण न करणे, दर्शनी भागात दर सूची लावलेली नसणे, मंजूर खाटा व प्रत्यक्ष खाटा यात तफावत असणे, बायोमेडिकल वेस्टची व्यवस्था नसणे अशा त्रुटी आढळलेल्या व दोषी असलेल्या अहिल्यानगर शहरातील 32 रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
महाराष्ट्र शुश्रृषागृह नोंदणी नियम, 2021 अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची तपासणी करून दैनंदिनी अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्यानुसार महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने नोंदणीकृत 230 पैकी 215 रूग्णालयांची तपासणी पूर्ण केली आहे. त्यात त्रुटी आढळलेल्या व दोषी असलेल्या 32 रूग्णालयांना नोटिसा बजावण्यात आहेत. खासगी रूग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम, 2021 अंतर्गत नियमांचे काटेकोर पणे पालन होते किंवा नाही, याची खातरजमा या तपासणीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्राधान्याने रूग्णालयामध्ये आकारण्यात येणार्या फी व इतर रूग्णालयीन सेवेचे शुल्क, दरपत्रक रूग्णालयाच्या दर्शनी भागांत लावण्यात यावे. तसेच महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, 2021 मधील अंतर्भूत रूग्ण हक्क संहिता रूग्णालयाच्या दर्शनी भागांत स्वच्छ अक्षरात लावण्यात आले आहेत का, याची तपासणी करण्यात आली आहे.
पथकाने केलेल्या तपासणीत चार रूग्णालयांकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. तीन रूग्णालयांनी बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार परवाना नूतनीकरण केलेला नाही. तर, 10 रूग्णालयांमध्ये दर्शनी भागात दर सूची लावण्यात आलेली नाही. मंजूर खाटा व प्रत्यक्ष खाटा यात तफावत असलेली 10 रूग्णालये आढळून आली. पाच रूग्णालयांमध्ये बायोमेडिकल वेस्टची व्यवस्था नसल्याचे तपासणीत समोर आले. अशा एकूण 32 रूग्णालयांना आरोग्य विभागाने नोटीसा बजावल्या आहेत.
…तर परवाना रद्द होणार
त्रुटी आढळलेल्या व दोषी असलेल्या अहिल्यानगर शहरातील 32 रूग्णालयांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. महिनाभरात त्यांनी त्रुटींची पूर्तता न केल्यास त्यांचा रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.