Thursday, May 2, 2024
Homeनगरमहापालिका स्थायी समितीला 802 कोटींचे अंदाजपत्रक सादर

महापालिका स्थायी समितीला 802 कोटींचे अंदाजपत्रक सादर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिकेचे सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे 802 कोटींचे मूळ अंदाजपत्रक शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सभापती कुमार वाकळे यांच्याकडे सादर केले. दरम्यान, अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली असून सोमवार, 14 मार्चला पुन्हा ही सभा होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती वाकळे यांनी दिली.

- Advertisement -

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, सहायक आयुक्त सचिन राऊत, मुख्यलेखाधिकारी शाहजहान तडवी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदींसह स्थायी समिती सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. अंदाजपत्रकविषयी माहिती देताना आयुक्त गोरे म्हणाले, शहरवासियांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी नविन रस्ते व रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य, वीज, पाणी या सेवा चांगल्या दर्जाच्या देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शासनाकडून प्राप्त विविध कामांसाठीच्या निधीतील कामे पूर्णत्वास नेणे व नविन कामांसाठी शासन निधी मिळविणे, मनपा हिस्स्याची रक्कम भरणे आदी कामे तसेच घनकचरा संदर्भातील कामे, चितळेरोड भाजी मार्केट जागा विकसीत करणे, नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण करणे, मिटरद्वारे पाणी पुरवठा, शहर स्वच्छता अभियान, गतिशिल प्रशासन, तसेच शहर व उपनगर मधील भागांचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले.

सादर केलेल्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न 373 कोटी 91 लाख, भांडवली जमा 372 कोटी 04 लाख धरले आहे. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी 51 कोटी 22 लाख, संकलीत करावर आधारीत करापोटी 67 कोटी 21 लाख, जी एस टी अनुदान 111 कोटी 67 लाख व इतर महसुली अनुदान 27 कोटी 65 लाख, गाळा भाडे 3 कोटी, पाणीपट्टी 26 कोटी 40 लाख, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी 42 कोटी, संकीर्ण 24 कोटी 80 लाख़ आशा महत्त्वाच्या तरतुदी आहेत. तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरून 372 कोटी 04 लाख अंदाजित जमा होणार आहेत.

कामगारांनी पाडली सभा बंद

महापालिका कामगारांच्या धरणे आंदोलनाचा शुक्रवारी 12 वा दिवस होता. त्यांच्या प्रलंबित प्रश्नावर गुरुवारी आ. संग्राम जगताप व महापालिका कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मंत्रालयात विविध विभागाच्या अधिकारी व मंत्र्यांच्या गाठी भेटीचे घेतल्या त्यावेळी महापालिकेतील आयुक्त व उपायुक्त मुंबईत असूनही मंत्रालयात न आल्याने कामगार संघटना आक्रमक झाली. आक्रमक झालेल्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी शुक्रवारी महापालिकेतील स्थायी समितीतील आर्थिक अंदाजपत्रकीय सभा बंद पाडत आयुक्तांनाच जाब विचारला. संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर यांच्यासह सर्व कर्मचारी घोषणा देत व आयुक्त, उपायुक्तांचा निषेध करत स्थायी समिती सभागृहात शिरले. त्यांनी सभागृहात ठिय्या मांडला. अहमदनगर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिका कामगार संघटनेने स्थायी समितीची सभा बंद पाडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या