Thursday, April 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLocal Body Elections 2025 - राज्यातील ३५ प्रभागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित

Local Body Elections 2025 – राज्यातील ३५ प्रभागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल केलेल्या अपिलावर न्यायालयाचा अंतिम आद्यपही आदेश झाला नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचयतींमधील ३५ प्रभागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ३५ प्रभागात येत्या २ डिसेंबर मतदान होणार नाही. याशिवाय उमेदवार मृत्यू पावल्याने तीन प्रभागातील सदस्यपदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या विरोधात अपिल दाखल झालेल्या ३५ प्रभागात अजूनही जिल्हा न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे किंवा सुनावणी होऊन अंतिम निर्णय आलेला नाही. त्यामुळे अशा ३५ ठिकाणी उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करता येणार नाही. तसेच अशा प्रभागातील निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे.

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरु झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर अशी होती. या कालावधीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी १८ नोव्हेंबरला करण्यात आली. छाननीत ज्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले, अशांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले. अपिल नसलेल्या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २१ नोव्हेंबर अशी होती. तर जेथे अपिल दाखल आहेत, अशा ठिकाणी अर्ज माघारीची मुदत २५ नोव्हेंबर २०२५ होती.

मात्र,माघारीची मुदत उलटून गेल्यानंतरही अपिल दाखल असलेल्या ३५ प्रभागात न्यायालयाकडून अंतिम निर्णय न आल्याने येथील निवडणुकांना स्थगिती देण्याची नामुष्की निवडणूक आयोगावर ओढवली आहे. राज्य निवडणूक आयोगाने तसे पत्र अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, गोंदिया, जालना, लातूर, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. दरम्यान, पिंपळनेर (जि. धुळे), मनमाड (जि. नाशिक) आणि गेवराई (जि. बीड) येथे निवडणूक लढवत असलेल्या तीन उमेदवारांचा मतदानापूर्वी मृत्यू झाल्याने येथील निवडणुकीला आयोगाने स्थगिती दिली आहे.

ताज्या बातम्या

Accident News : पिकअपच्या धडकेत शिर्डी विमानतळाच्या दोन कर्मचार्‍यांचा जागीच मृत्यू

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील लोणी-आडगाव रोडवर मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणार्‍या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने शिर्डी विमानतळावर कार्यरत...