Wednesday, January 15, 2025
Homeक्राईमपैशाच्या वादातून केला मित्रानेच मित्राचा खून

पैशाच्या वादातून केला मित्रानेच मित्राचा खून

14 महिन्यांपूर्वी घडलेल्या घटना उलगडा

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

चौदा महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या (Kopargav Police Station) हद्दीत इसमाचा मृतदेह (Dead Body) आढळला होता. तेव्हा अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. परंतु चौदा महिन्यानंतर हा खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. मित्रानेच पैशाच्या वादातून मित्राचा खून (Money Dispute Friend Murder) केल्याचा उलगडा पोलिसांनी केला. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 28 जून 2023 रोजी अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. मयत अभिजित राजेंद्र सांबरे (रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) यांचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना अकस्मात मृत्यूबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्यांनी संशयित प्रमोद जालिंदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले यांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -

संशयित रणमाळे याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांनी चौकशी केली. तपास कौशल्य, अकस्मात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन, तांत्रिक विश्लेषण करून विचारपूस केली, तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. रणमाळे हा मयत अभिजित सांबरे याचा मित्र होता. त्यांचे यापूर्वीपासून पैशांचे व्यवहार होते. त्यातून त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे संशयित रणमाळे याने अभिजित सांबरे यास मारण्याचा डाव आखला. 27 जून 2023 रोजी आर्थिक व्यवहाराकरिता यातील मयत अभिजित हा येवला (Yeola) येथे जाणार होता. त्याने प्रमोद रणमाळे यास येवल्यात येण्याचे कळविले.

प्रमोद रणमाळे याने यातील मयत अभिजित सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री नऊ वाजता दारूमधून ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरिक्त मात्रेमध्ये गोळ्या मिसळून त्यास दारू (Alcohol) पाजली. त्यानंतर दुचाकीवर वैजापूर गावाजवळून कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला. अभिजितची शुद्ध हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून दिले व पोबारा केला, अशी कबुली पोलिसांना दिली. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट दोनने केलेल्या तपासानंतर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल झाला आहे. संशयित प्रमोद रणमाळे यास पुढील तपासासाठी कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, नाशिक शहर पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, स्वप्नील जुंद्रे यांनी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या