मुंबई | Mumbai
पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, न्याय करा, च्या मृत चिमुरडीला न्याय द्या अशी मागणी जनतेकडून होत असून या घटनेमुळे लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहेत. अनेक नेत्यांनी देखील या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला आहे.
सरकारने विचार न करता हालहाल करत संपवावं
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं, असं राज ठाकरे म्हणाले.
ही तत्परता स्त्रियांचे मुलींचे शोषण करताना सरकार दाखवत नाही
सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्टट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणते तेव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
महाराष्ट्राचं ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ विचलित झालं
आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच पण अशा घटना वारंवार का घडत आहेत? ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाचा, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो, सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. दोनचार दिवसांत हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल यावर आपण कधी बोलणार आहोत का? या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे, महाराष्ट्राचं ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ विचलित झालं आहे आणि कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही.
सत्तेच्यासाठी वाट्टेल ते याचं असं काही उदात्तीकरण होत आहे
‘सत्ता’ मिळवणे, ती गाजवणे याचा एक भस्मासुर जो वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालायला लागला आहे त्याने महाराष्ट्र पूर्ण विस्कटायला लागला आहे. प्रत्येकाला या ना त्या मार्गाने सत्ता मिळवायची आहे आणि गाजवायची आहे. राजकारण्यांना, काही उद्योगपतींना सत्ता हवी आहे. हल्ली लेखकांना पण साहित्य संमेलनाच्या मार्फत सत्ता गाजवायचा मोह होतो. अगदी एशियाटिक सारख्या संस्थेत सुद्धा सत्तेची लढाई पेटते, आणि एकूणच सत्तेच्यासाठी वाट्टेल ते याचं असं काही उदात्तीकरण होत आहे की हाच पुरुषार्थ वाटतो. जे वरती घडतं त्याचं प्रतिबिंब खाली उमटत असतं. अगदी दुबळा माणूस सुद्धा या सगळ्यात सैरभैर होऊन आपल्यापेक्षा दुबळ्यांच शोषण करतो. याकडे पूर्वी मोठ्यांचं लक्ष असायचं, कोणीतरी कोणाचे तरी कान उपटायचे. राजकारण्यांना पत्रकारांचा धाक होता, समाजात प्रत्येकाकडे कोणाचं तरी कोणाकडे लक्ष असायचं तेच हललं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
कायद्याची दहशत, नियंत्रण नाहीस झालेल दिसतंय
पूर्वी आपल्याकडे कोणीतरी बघतंय, उद्या काही केलं तर आपली, आपल्या घरच्यांची समाजात छीथू होईल ही भीती असायची तीच आता नष्ट झाली आहे . हे गंभीर आहे. समाजात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती असतात. त्यातल्या वाईट प्रवृत्तींवर समाजाची, कायद्याची जी दहशत, नियंत्रण असायला हवं तेच नाहीस झालेल दिसतंय. हाताबाहेर गेलेली लालसा +सत्ता गाजवण्याची हाव + ओटीटी वरचा कन्टेन्ट + पैशाच्या आणि जमिनीच्या मागे फरफटत जाणे आणि मोबाईलमध्ये सतत गुंतून राहणे याने सगळी घडी विस्कटली आहे.
उदारीकरणाने सगळी जुनी मूल्यव्यवस्था उध्वस्त केली
या आणि अशा घटनांनी महाराष्ट्र अधिक जखमी होत आहे याचं भान माध्यमं, राजकारणी आणि समाजांनी ठेवलं पाहिजे . मी नेहमी माझ्या भाषणांत सांगतो की 1995 नंतर महाराष्ट्र आरपार बदलला. 1992 पासून जगाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले गेले . उदारीकरणाचे वारे देशभर घुमू लागले , परंतु हे वारे आपण निट समजूनच घेतले नाहीत .उदारीकरणाने प्रचंड फायदे झाले पण जिथे आम्हाला लोकशाहीच समजली नाही तीथे उदारीकरण काय समजणार ? उदारीकरणाने सगळी जुनी मूल्यव्यवस्था उध्वस्त केली आणि नवी व्यवस्था इतकी व्यक्तिकेंद्रित आणि लालसाकेंद्रित केली की जर आपण आजच यावर सर्वांगाने विचार केला नाही तर मात्र आपला वाली कोणीच नाही हे नक्की. मी माझा पक्ष याच समाजाचा घटक आहोत. ज्या ज्या गोष्टी मी सुचवल्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी आणि माझा पक्ष सर्वतोपरी पुढे असू हे नक्की. अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं ‘लक्ष’ आणि भरकटलेलं ‘लक्ष्य’ पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारने तातडीने करावं, असं राज ठाकरे पोस्टद्वारे म्हणाले.
देशदूतच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





