Thursday, March 13, 2025
HomeनाशिकCourt Verdict : भावाच्या हत्येप्रकरणी बहिणीची निर्दोष मुक्तता

Court Verdict : भावाच्या हत्येप्रकरणी बहिणीची निर्दोष मुक्तता

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मद्याच्या नशेत भांडण करत लठ्ठ म्हणणार्‍या लहान भावाचा संतापून धारदार चाकू छातीत खुपसून खून करणारी मोठी बहीण शोभा भगवान गारूडकर हिची सबळ पुराव्याअभावी येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.यु. बघेले यांनी निर्दोष मुक्तता केली.

- Advertisement -

मनमाड शहरात खळबळ उडवून देणार्‍या या गुन्ह्याच्या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, 26 एप्रिल 2022 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संदीप भगवान गोंगे हा दारूच्या नशेत मोठी बहीण शोभा गारूडकर हिच्याशी भांडण करत तिला लठ्ठ असल्याचे सांगत चिडवत होता. यातून संतापलेल्या शोभा गारूडकर हिने भाजीपाला कापण्यासाठी वापरत असलेला धारदार चाकू संदीपच्या छातीत खुपसल्याने तो जागीच गतप्राण झाला होता. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन शोभा गारूडकरला पोलिसांनी अटक करत तिची रवानगी तुरुंगात केली होती. तपासाअंती पोलिसांनी हा खटला सुनावणीसाठी न्यायालयात वर्ग केला होता.

या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.यु. बघेले यांच्यासमोर झाले. आरोपी शोभा गारूडकर यांच्यातर्फे अ‍ॅड. सुधीर अक्कर यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे फिर्यादी सविता परमार व साक्षीदार नवनाथ सानप, सागर आव्हाड, मृत संदीपची आई सुनंदा गोंगे व पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी नोंदवण्यात आल्या. या घटनेसंदर्भात युक्तिवाद करताना अ‍ॅड. सुधीर अक्कर यांनी भावाने लठ्ठ म्हटले म्हणून सख्या बहिणीने चाकू छातीत खुपसून खून केला ही घटना बघणारे एकही साक्षीदार पोलीस तपासात मिळून आलेले नाही. आरोपी शोभा खून केल्यानंतर स्वत: चाकू घेऊन पोलीस ठाण्यात शरण गेली, असे पोलिसांचे म्हणणे होते.

मात्र जप्त केलेल्या चाकूवर शोभाच्या बोटांचे ठसे असल्याचा कोणताही पुरावा न्यायालयात हजर करण्यात आलेला नाही. जप्त चाकूवर रक्ताचे डाग असल्याचा उल्लेख पंचनाम्यात नाही. शोभा शरण आल्याचे सीसीटीव्ही फुटेजसुद्धा न्यायालयात सादर करण्यात आलेले नाहीत. खून झाल्याची घटना दुपारी दोन वाजता घडली, आरोपी व पोलीस ठाण्याचे अंतर पाच मिनिटांचे असताना आरोपी अटक पंचनामा रात्री नऊ वाजता का केला गेला याचे स्पष्टीकरण पोलीस देऊ शकलेले नाही व आरोपीच्या अंगावरील कपड्यांवर रक्ताचे डागदेखील आढळून आलेले नाही. भावाचा खून केला हे शाबीत करणारा कोणताही पुरावा रेकॉर्डला नसल्याकडे अ‍ॅड. अक्कर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले असता न्या. बघेले यांंनी हा युक्तिवाद ग्राह्य मानत या खुनाच्या आरोपातून शोभा गारूडकर हिची निर्दोष मुक्तता केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...