Saturday, June 13, 2026
HomeनगरAhilyanagar : सचिन जगताप यांच्यासाठी राष्ट्रवादी समर्थकांचा बंडाचा इशारा

Ahilyanagar : सचिन जगताप यांच्यासाठी राष्ट्रवादी समर्थकांचा बंडाचा इशारा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी महत्त्वपूर्ण व आक्रमक भूमिका मांडली आहे. माजी आ. अरुणकाका जगताप हे या मतदारसंघातून दोनदा अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांना आणि आ. संग्राम जगताप यांना या निवडणुकीचे अचूक गणित आणि जोडण्या लावण्याची उत्तम हातोटी आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी व मतदारांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असून, या जागेवर जगताप कुटुंबीयांचाच पहिला हक्क आहे, असे भोसले यांनी स्पष्ट केले. तसेच, आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांना पक्षाने उमेदवारी द्यावी; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक या निवडणुकीत मतदानाबाबत वेगळा विचार करतील, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

भोसले पुढे म्हणाले, स्वर्गीय जगताप यांनी दोन वेळा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करताना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना मजबूत केली. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबाच्या नैतिक आणि राजकीय हक्काचा विचार प्राधान्याने व्हायला हवा. सचिन जगताप यांना उमेदवारी देऊन पक्षाने त्यांच्या कुटुंबाच्या योगदानाचा सन्मान करावा. निष्ठावंतांना डावलल्यामुळेच तुतारीची पिपाणी झाली. यावेळी गणेश भोसले यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्रीपद वाटपावर तीव्र शब्दांत भाष्य केले. ते म्हणाले, त्या काळात आमदार संग्राम जगताप यांचा मंत्रीपदावर दावा असतानाही त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. त्यांच्याऐवजी पहिल्यांदाच आमदार झालेल्या तनपुरे यांना मंत्रीपद देण्यात आले. आज ते कोणत्या पक्षात आहेत, हे संपूर्ण राज्य पाहत आहे. निष्ठावंतांना डावलून घेतलेल्या त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम आज समोर येत असून, म्हणूनच तुतारीची पिपाणी झाली आहे.

नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे रुजवून पक्षाचा वटवृक्ष करण्याचे मोठे काम आ. जगताप यांनी केले आहे. तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय, संघर्षशील आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही संग्राम जगताप यांना मंत्री करण्यासाठी प्रबळ आग्रह होता. मात्र, मामाच्या हट्टापायी शेवटच्या टप्प्यात त्यांना डावलून कारखानदारीला प्राधान्य देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने घेतला. राजकारणात जे पेरले जाते तेच उगवते; निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत योग्य न्याय मिळालाच पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे भोसले यांनी स्पष्ट केले.

मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःचा मतदारसंघ, पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांसाठी नेमके काय योगदान दिले? याचे उत्तर आजही कोणाकडे नाही. केवळ सत्तेच्या समीकरणांसाठी वारंवार पक्ष बदलण्याची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे. शरद पवार गटाने कर्तृत्वापेक्षा घराणेशाहीला दिलेले प्राधान्य, निष्ठावंतांवर केलेला अन्याय आणि जनाधार असलेल्या खर्‍या नेतृत्वाकडे केलेले दुर्लक्ष, यामुळेच आज त्या पक्षाची ही दुरावस्था झाली आहे, असा दावाही भोसले यांनी केला.

ताज्या बातम्या

संपादकीय : १३ जून २०२६ – खांद्यावरील जू उतरले, पण व्यवस्थेचे...

0
लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशिनाथ गायकवाड व त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई यांचे जे चित्र समाज माध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये झळकले, ते आधुनिक, प्रगत आणि डिजिटल भारताचा दावा...