Friday, September 20, 2024
Homeनगरमालट्रक-कारची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

मालट्रक-कारची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

चौघे जखमी || नगर-दौंड महामार्गावरील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर- दौंड महामार्गावर हिवरेझरे (ता. नगर) गावाजवळ काल, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास मालट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अन्य चौघेजण जखमी झाले आहेत. मयत व जखमी हे सर्वजण छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत.

आदेश राधाकिसन डाकरे असे मयताचे नाव असून जखमींची नावे समजू शकली नाहीत. हे सर्वजण कारने (एमएच 20 ईवाय 1012) नगरहून दौंडकडे जात होते. सकाळी आठच्या सुमारास हिवरेझरे (काळेवाडी) शिवारात 14 मैल जवळ दौंडकडून भरधाव वेगात नगरकडे येत असलेल्या मालट्रकची (एचआर 55 व्ही 4478) आणि कारची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. अपघातात कारमधील जखमी अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली.

बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर मयत व जखमींना कारच्या बाहेर काढण्यात यश आले. स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णवाहिकेतून नगरला पाठविले. नगर तालुका पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक तसेच महामार्ग पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मालट्रक चालक सलीम मोहंमद (रा. मणिपूर) याला ताब्यात घेतले आहे. नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद फाट्यावर मागील आठवड्यात खासगी आराम बस उलटून भीषण अपघात झाला होता. त्यात दोघांचा मृत्यू तर 5-6 प्रवासी जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी पुन्हा एका भीषण अपघात झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या