पुणे । Pune
महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या हजारो तरुणांच्या कष्टावर पाणी फिरवणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५, दौंड अंतर्गत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत चक्क एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून ८५ टक्के प्रश्न जसेच्या तसे विचारण्यात आल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकारानंतर राज्य पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेत ही भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे.
शनिवार, २ मे २०२६ रोजी इंदापूर येथील एका नामांकित महाविद्यालयात ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदासाठी १०० गुणांची लेखी परीक्षा पार पडली. ए, बी, सी आणि डी अशा चार संचांमध्ये ही प्रश्नपत्रिका विभागली होती. मात्र, परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलेल्या उमेदवारांच्या लक्षात आले की, या प्रश्नपत्रिकेतील तब्बल ८५ प्रश्न हे ‘महाराष्ट्र पब्लिकेशन’च्या ‘पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव संच १०’ मधून जसेच्या तसे, अगदी पर्यायांसह उचलण्यात आले होते. १०० पैकी ८५ प्रश्न एकाच खासगी पुस्तकातून आल्याने पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
हा प्रकार सोशल मीडिया आणि माध्यमांमधून समोर येताच परीक्षार्थींमध्ये प्रचंड खळबळ उडाली. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत, “सरकार तरुणांच्या भवितव्याशी खेळत आहे का?” असा सवाल उपस्थित केला. तर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
वाढता दबाव आणि तक्रारींची दखल घेत अप्पर पोलीस महासंचालकांनी लेखी पत्रक काढून ही भरती प्रक्रिया स्थगित करण्याची घोषणा केली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, “राज्य राखीव पोलीस बल गट ५, दौंड यांच्या लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिका एका खासगी सराव संचातील असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ४ मे २०२६ पासून पोलीस उपमहानिरीक्षक, SRPF पुणे यांच्यामार्फत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.” जोपर्यंत या चौकशीचा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत दौंड गटाची पुढील सर्व भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतरच फेरपरीक्षा घ्यायची की काय, याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
पोलीस भरतीसाठी ग्रामीण भागातून अनेक तरुण मोठ्या अपेक्षेने येतात. मात्र, अशा प्रकारच्या त्रुटींमुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याने तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. आता सर्वांचे लक्ष पुणे पोलीस उपमहानिरीक्षकांच्या चौकशी अहवालाकडे लागले आहे. ही केवळ मानवी चूक आहे की यामागे काही मोठे रॅकेट काम करत आहे, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.





