
अहिल्यानगर (प्रतिनिधी)
नगर एमआयडीसीमधील नागापूर चौक ते सह्याद्री चौकादरम्यान नगर-मनमाड महामार्गावर दर शनिवारी थेट भररस्त्यात जीवघेणा भाजीबाजार भरत आहे. महामार्गावर भरणाऱ्या या बाजारात भाजी विक्रेत्यांसह खरेदीदारांनाही आपल्या जिवाची पर्वा नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ता अत्यंत अरूंद झाला आहे. तरीही या धोकादायक बाजाराकडे एमआयडीसी प्रशासन, वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.
नगर एमआयडीसीत परप्रांतीय मजुरांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कामगार मोठ्या संख्येने रोजगारासाठी वास्तव्यास आहेत. नागापूर, बोल्हेगाव व गजानन कॉलनी परिसरात राहणाऱ्या या कामगारांच्या दैनंदिन गरजांसाठी मनमाड रस्त्याच्या कडेला दुकाने वसली आहेत. दिवसभर शांत असणारा हा रस्ता सायंकाळी ५ नंतर गर्दीने फुलून जातो. कामगारांची सुट्टी झाल्यानंतर भाजी खरेदीसाठी मोठी लगबग उडते. शनिवारी एमआयडीसीला अधिकृत सुट्टी असल्याने या दिवशी महामार्गावरच मोठा बाजार भरतो.
भाजी विक्रेते महामार्गावरच दुकाने थाटत असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यातून वाट काढताना दुचाकी, चारचाकी, एसटी बस व अवजड वाहनचालकांच्या नाकी नऊ येत आहेत. रात्रीच्या वेळी गर्दीमुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या एमआयडीसी परिसरात नागापूर चौक ते सह्याद्री चौकादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामाला नागापूर चौक ते सह्याद्री चौकादरम्यान सुरूवात झालेली आहे. या ठिकाणी उड्डाणपूलाचे पिलर आणि गर्डर टाकण्यात येत आहेत.
यामुळे या भागात आधीच वाहतूक कोंडी असतांना त्या भाजीबाजारामुळे गर्दीत वाढ होतांना दिसत आहे. यापुढे सण आणि उत्सवाचे दिवस सुरू होणार असून मोठ्या संख्येने या भागातून वाहतूक वाढणार असल्याने पोलिसांसह एमआयडीसी प्रशासनाने नागापूर चौक ते सह्याद्री चौकादरम्यान वाहतूक कोंडी फोडण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्त्यावर स्टॉल्स अन् भल्यामोठ्या छत्र्या
दर शनिवारी निवारी नागापूर चौक ते सह्याद्री चौक या संपूर्ण रस्त्यावर भाजीपाला, सुके मासे, कपडे व फळविक्रेते महामार्गाला लागूनच स्टॉल्स आणि भल्यामोठ्या छत्र्या लावून व्यवसाय करतात. त्यामुळे रात्री ९ ते १० वाजेपर्यंत वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. या गंभीर समस्येकडे प्रशासन कधी लक्ष देणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दुभाजकांवर दुचाकींची बेकायदेशीर पार्किंग
नागापूर चौकापुढील महामार्गाच्या दुभाजकांवर (डिव्हायडर) खरेदीदार बिनधास्त दुचाकी पार्क करत आहेत. मुख्य महामार्गावरील या पार्किंगकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्वर्य व्यक्त होत आहे. सध्या रस्त्यावर केवळ एकच अवजड वाहन जाऊ शकेल एवढी जागा शिल्लक राहते.
रस्त्यावरच खासगी वाहने अन् एसटीचा थांबा
नागापूर चौक ते सह्याद्री चौकादरम्यान उड्डाणपुलाच्या कामामुळे १२ ते १५ मीटर रुंदीचा रस्ता आता अवघा ६ ते ८ मीटर उरला आहे. त्यातच या अरुंद रस्त्यावर खासगी प्रवासी वाहने, ट्रक व एसटी बसेस प्रवासी चढ-उतार करण्यासाठी थांबतात. भाजीबाजार आणि वाहनांचे थांबे यामुळे या भागात अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे.
शॉर्टकटसाठी उलट्या दिशेने प्रवास
या ठिकाणी भाजीबाजारात प्रवेश घेण्यासाठी पलिकडच्या बाजून म्हणजे मनमाडकडे जाणाऱ्या बाजूने (रस्त्याच्या डावीकडे) येण्यासाठी दुचाकीस्वार हे या ठिकाणी चक्क उलट्या दिशेने प्रवास करतांना दिसले. सायंकाळी रहदारीची वेळ, चाकीचाकी आणि अवजड वाहनांची गर्दी असतांना अनेकांचा शॉर्टकटसाठी उलट्या दिशेने प्रवास सुरू असल्याचे यावेळी दिसून आले.




