Friday, July 5, 2024
Homeनगरनगर-मनमाड महामार्गावर तब्बल चार तास वाहतूक खोळंबली; काय आहे कारण?

नगर-मनमाड महामार्गावर तब्बल चार तास वाहतूक खोळंबली; काय आहे कारण?

कोल्हार । वार्ताहर

- Advertisement -

आज सकाळी नगर – मनमाड महामार्गावर तब्बल चार तास वाहतूक खोळंबली होती. खोळंबलेल्या वाहतुकीत बराच काळ अडकून पडावे लागल्याने प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आज रविवार असल्याने या महामार्गावरुन शिर्डी – शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्याही अधिक होती.

लिंब घेऊन चाललेला मालवाहतूक ट्रक चिंचोली फाट्यानजीक रस्त्यावर उलटल्याने वाहतूक खोळंबली होती. कोल्हारपासून ३ किलोमीटर अंतरावर ही घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. कदाचित सकाळच्या प्रहरी चालकाला डुलकी लागल्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज आहे. ट्रक महामार्गावर उलटल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली. त्यामुळे नगर – मनमाड महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या दुतर्फा लांबचलांब रांगा लागल्या.

हे ही वाचा : पावसाच्या खंडामुळे धाकधूक वाढली; खरीप हंगामाच्या किती हेक्टरवर पेरण्या पूर्ण?

कोल्हारमध्ये वाहतूक ठप्प होणे ही काही नवीन बाब नाही. कधी येथील पुलावरील खड्ड्यामुळे, तर कधी पुलावर वाहनांच्या झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे, तर कधी अपघातामुळे, अशा निरनिराळ्या कारणांमुळे या भागात वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वारंवार होत असतात. येथील ग्रामस्थांना हा कायमचा वैताग झाला आहे. आता तर ही डोकेदुखी येथील ग्रामस्थांच्या अंगवळणी पडली आहे.

हे ही वाचा : धक्कादायक! कृषी विभागाचे बियाणे उगवलंच नाही; शेतकऱ्यांवर कोसळले संकट

रस्त्यावर पलटलेल्या ट्रकजवळून एनकेनप्रकारे वाहने काढण्याच्या नादात सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुतर्फा वाहतूक आणखी जास्त ठप्प होत गेली. बराच वेळानंतर कोल्हार पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. पूर्णतः वाहतूक सुरळीत होण्याकरिता साडे अकरा ते बारा वाजले. सकाळपासून रेंगाळलेली वाहतूक चार तासानंतर पूर्ववत झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या