अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर तालुक्यातील एका गावातील हायस्कूलजवळून दोन बहिणींचे एकाच वेळी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (23 मे) घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलींच्या आईने यासंदर्भात रविवारी (25 मे) फिर्याद दिली आहे. फिर्यादी अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहतात. त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी व दुसरी 21 वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या, परंतु रात्री आठ वाजे पर्यंतही घरी परतल्या नाहीत. दरम्यान, यासंदर्भात फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी मुलींचा शोध सुरू केला असता त्या मिळून आल्या नाहीत. त्यांचे अपहरण झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गावातील हायस्कूलजवळून त्यांना अज्ञात व्यक्तीने फसू लावून पळवून नेले असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. त्यांनी शोध घेतल्यानंतर देखील मुली मिळून न आल्याने त्यांनी रविवारी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक वाघ अधिक तपास करीत आहेत.