Thursday, May 2, 2024
Homeनगरसंचालकांच्या प्रॉपर्टी विकून आमचे पैसे द्या

संचालकांच्या प्रॉपर्टी विकून आमचे पैसे द्या

अहमदनगर/कर्जत |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन मल्टीस्टेटशेड्युल्ड बँकेच्या हजारो खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले असून याला जबाबदार संचालक मंडळ आहे. त्यामुळे या संचालकांनी राजीनामे द्यावेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत व त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करून आणि त्या विकून ठेवीदार व खातेदारांचे पैसे द्यावेत, अशी मागणी बँकेच्या कर्जतमधील खातेदारांनी मंगळवारी केली. दरम्यान, या खातेदारांनी सुरू केलेल्या उपोषणास शहरातील बँकेच्या अनेक सभासदांनी भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला.

- Advertisement -

बँकेच्या येथील मुख्यालयासमोर कर्जतमधील महेश जेवरे, अरविंद काळोखे, विजय जोशी, सचिन भंडारी, चेनसुख पितळे, सुनील कोठारी, अतुल कोठारी, प्रफुल्ल नेवसे, अशोक सुपेकर, कल्याण काळे, रविकिरण नेवसे आदींसह सुमारे 50 च्यावर खातेदारांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या अर्बन बँक खात्यातील आर्थिक व्यवहार रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे ठप्प झाले आहेत. त्यामुळे त्यांचे व्यापारी व्यवहारही बंद पडले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे बँकेच्या संचालकांनी रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करून किमान या खात्यांवरील व्यापारी व्यवहार तरी सुरळीत करावेत, तसेच 6 डिसेंबर 2021 पासून बँकेवर निर्बंध लागले असल्याने या तारखेनंतर या व्यापार्‍यांच्या खात्यात बाहेरून जमा झालेले पैसे मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. सुमारे 10 कोटी रुपयांचे त्यांचे व्यवहार बंद झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यासाठी त्यांनी बँकेच्या मुख्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना संतप्त भावना व्यक्त केल्या. बँकेतील चुकीच्या कर्जवाटपाने बँक अडचणीत आली असून, पोलिसांत गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र, संचालकांनी केलेल्या चुकीच्या कर्ज वाटपाची शिक्षा ठेवीदार व खातेदारांना भोगावी लागत आहे. बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावल्याने सर्वच खात्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बँकेच्या संचालकांकडून थकबाकी वसुली होत नाही, त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे निर्बंध रद्द होत नाही, असा दावा उपोषणकर्त्यांनी केला. बँकेला पुन्हा सुस्थितीत आणण्यात संचालक मंडळाला अपयश येत असल्याने या संचालकांनी राजीनामे द्यावेत, पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत व जिल्हा प्रशासनाने या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करून त्यांची विक्री करावी व ठेवादार आणि खातेदारांचे पैसे द्यावेत, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. यावेळी बँकेत पैसे अडकल्याने होत असलेल्या त्रासाची माहिती सांगताना, काहींचे डोळे भरून आले. वडिलांच्या उपचारासाठी पैसे मिळाले नाहीत, मुलांना शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, व्यवसाय ठप्प झाल्याने नव्या व्यवसायासाठी उसनेपासने करून पैसे आणावे लागले, अशा विविध अडचणी त्यांनी मांडल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या