Friday, May 3, 2024
Homeनगरअर्बनच्या ठेवीदारांचा नगरमध्ये मोर्चा

अर्बनच्या ठेवीदारांचा नगरमध्ये मोर्चा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँक बुडवण्यास संचालक मंडळासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी कारणीभूत आहेत. या दोषींवर कारवाई करताना त्यांची संपत्ती जप्त करून ठेवीदारांचे पैसे दिले जावेत व बँकेच्या स्थावर मालमत्तेला हात लावला जाऊ नये. व्हाईट कॉलर डाकूंनी ठेवीदारांच्या पैशांची लूटमार केली असल्याचा आरोप नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी बुधवारी मोर्चातून केला.

- Advertisement -

नगर अर्बन बँकेचा बँकींग परवाना रद्द झाला आहे. या बँकेत ठेवीदारांचे सुमारे साडेतीनशे कोटी रुपये अडकले आहेत. ते परत मिळावेत यासाठी येथील ठेवीदार डी. एम. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यात नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा, मनोज गुंदेचा, अ‍ॅड. अच्युत पिंगळे, संजय झिंजे, बहिरनाथ वाकळे, विनोद गुंडू, दत्तात्रय ढवळे, अनिल भागवत, अलका व शेखर बोत्रे, सुलभा कुलट, रमेश कुलट, यशवंत गवळी, सुमन गवळी, राजेंद्र कर्डिले, वैशाली कुलकर्णी आदींसह संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, जामखेड, पारनेर, शेवगाव, कर्जत तालुक्यांतील ठेवीदार सहभागी झाले होते. नगर अर्बन बँक मुख्यालयापासून कापड बाजार, तेलीखुंट, सर्जेपुरा मार्गे मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी ठेवीदारांनी रोष व्यक्त करत घोषणाबाजी केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नगर अर्बन बँक बुडवण्यास संचालक मंडळ कारणीभूत असल्याचा दावा करीत ठेवीदारांनी यावेळी रोष व्यक्त केला. ठेवींचे दोन पैसे कमी मिळाले तरी हरकत नाही, पण बँक बुडवणार्‍या दोषींना शिक्षा देऊच, असा निर्धार करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोषींवर कारवाई होण्यासाठी तसेच ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही ठरवण्यात आले.दोषींवर कारवाई करताना त्यांची संपत्ती जप्त करून ठेवीदारांचे पैसे दिले जावेत व बँकेच्या स्थावर मालमत्तेला हात लावला जाऊ नये, असे यावेळी आवर्जून सांगण्यात आले. ठेवीदारांनी एकत्र राहिले तर त्यांच्या ताकदीचा विचार प्रशासनाला करावा लागेल, असेही यावेळी स्पष्ट केले गेले. पोलीस अधीक्षक कार्यालयावरील मोर्चानंतर आता पुन्हा एकत्र येऊन बँकेच्या संचालकांच्या घरांवर मोर्चे नेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

दरम्यान, कोतवाली पोलीस ठाण्यात चिल्लर घोटाळा, डमी जामीनदार घोटाळा, तोफखाना पोलीस ठाण्यात बनावट मूल्यांकन घोटाळा, शेवगाव पोलीस ठाण्यात बनावट सोनेतारण घोटाळा, राहाता पोलीस ठाण्यात बँकेचा तक्रार अर्ज, श्रीगोंदा पोलीस ठाण्यातही बँकेचा तक्रार अर्ज याशिवाय महाराष्ट्र ठेव संरक्षण कायद्यांतर्गत अनेक अर्ज येऊन व त्यांची पोलीस दप्तरी नोंद होऊनही पोलिसांनी दोषींवर कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने बँक आज बंद पडली आहे, असा रोषही ठेवीदारांनी यावेळी व्यक्त केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक खैरे यांनी मोर्चेकर्‍यांशी चर्चा केली व गोरगरीब ठेवीदारांचे पैसे मिळवून देताना दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक कमलाकर जाधव व शहराचे उपअधीक्षक अनिल कातकडे उपस्थित होते.

फॉरेन्सिकचा अहवाल मिळताच अटकसत्र

यावेळी ठेवीदारांशी बोलताना आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक जाधव यांनी बँकेचे फॉरेन्सिक ऑडीट अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. आठ दिवसांत त्याचा अहवाल पोलिसांना मिळणार आहे. बँकेत फ्रॉड केलेला पैसा विविध 32 बँकांतील खात्यांमध्ये जमा झाला आहे. त्यामुळे त्याचाही तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फॉरेन्सिक ऑडीट अहवाल आल्यावर दोषींचे अटकसत्र सुरू करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या