अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
वारंवार संपर्क करून देखील भाडे भरण्यासाठी लॉकरधारक अथवा त्यांचे कायदेशीर वारस हे पुढे न आल्याने असे 132 लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष उघडण्याचा निर्णय नगर अर्बन बँक प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली. दरम्यान, थकीत लॉकरचे भाडे संबंधित लॉकरधारक अथवा त्यांचे वारस यांचेकडून किंवा मुद्देमालाचा लिलाव करून वसूल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नगर अर्बन बँकेच्या विविध शाखांमधील लॉकर्स बाबत वारंवार जाहीर निवेदने दिल्यानंतरही तसेच संबंधित लॉकर्सधारकांना नोटिसा पाठवून संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या विविध शाखांमधील लॉकर्सबाबत बँक प्रशासनाने संबंधितांना उपलब्ध असलेल्या पत्त्यांवर नोटिसा पाठवून तसेच उपलब्ध असलेल्या मोबाईल, दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र 132 लॉकरधारकांनी अद्याप बँक प्रशासनाकडे संपर्क साधलेला नाही. लॉकर भाड्यापोटी मोठी रक्कम संबंधितांकडून बँकेला येणे थकबाकी आहे.
त्यामुळे असे लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष उघडून त्यातील चीज वस्तू आणि मुद्देमाल सीलबंद करून मुख्य शाखेतील लॉकरमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तसेच थकीत लॉकरचे भाडे संबंधित लॉकरधारक अथवा त्यांचे वारस यांचेकडून किंवा मुद्देमालाचा लिलाव करून वसूल करण्यात येणार आहे. या लॉकरधारकांची यादी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. लॉकरधारकांनी तत्काळ संबंधित शाखेशी अथवा बँक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन अवसायक गायकवाड यांनी केले आहे.