नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी दि.२ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी एकूण ५३ तर नगरसेवकपदाच्या २६४ जागांसाठी एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ६५.९४ टक्के मतदान झाले होते. यामध्ये त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत सर्वाधिक म्हणजे जवळपास ८५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज (दि.२१) रोजी मतमोजणी पार पडत असून, बऱ्याच ठिकाणी महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षपदासह विजयी झाले आहेत.
यात चांदवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे वैभव बागुल विजयी झाले आहेत. तर इगतपुरीत शिंदे सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शालिनी खातळे यांच्यासह शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना उबाठाचा एक उमेदवार निवडून आला आहे. तसेच पिंपळगावला भाजप-शिंदेसेनेचे १८ उमेदवार निवडून आले आहेत. तर नगराध्यक्षपदी भाजपचे मनोज बर्डे विजयी झाले आहेत. नांदगाव नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासह शिंदे सेनेचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आमदार सुहास कांदे यांचा करिष्मा दिसून आला आहे. याठिकाणी नगराध्यक्षपदी सागर हिरे विजयी झाले आहेत. तर येवला नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी हे १ हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर त्र्यंबकला नगराध्यक्षपदासाठी भाजपचे कैलास घुले आणि शिंदे सेनेच्या त्रिवेणी तुंगार यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.




