नागपूर । Nagpur
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. राऊळगाव येथील स्फोटक बनवणाऱ्या स्पेशल ब्लास्ट लिमिटेड (Special Blast Limited) या कंपनीमध्ये जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हा स्फोट एवढा तीव्र होता की ५ ते ६ किलोमीटर अंतरावर त्याचे हादरे जाणवले. स्थानिक रहिवाशांनी याबाबत माहिती दिली आहे. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट दिसून आले. अद्याप या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
स्फोटाच्या आवाजामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट उडाली. अनेकांनी हा भूकंप असल्याचा समज करून घेतला. मात्र, हा स्फोट स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये झाल्याचे नंतर स्पष्ट झाले. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून आणखी काही जण जखमी झाल्याची शक्यता आहे.
ही घटना काटोल तालुक्यातील एनविरा गावाजवळ घडली. या भागात स्पेशल क्लास लिमिटेड कंपनीचा २२५ एकरांमध्ये विस्तार आहे. येथे विविध प्रकारचे स्फोटक साहित्य तयार केले जाते. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून तपास सुरू आहे.
स्फोटानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलिस व स्थानिक प्रशासन यांनी तातडीने मदत कार्य हाती घेतले असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची टीम दाखल झाली आहे.