बीड | Beed
गेल्या अनेक दिवसांपासून बीडचे राजकारण तापले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेवर अनेक आरोप होत आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते करत आहेत. यातच राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठ्या संकटात सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या मदतीसाठी भगवान गड धावून आला आहे. भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी शुक्रवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेत आपण धनंजय मुंडे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असा संदेश दिला.
भगवाड गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले ‘भगवानगड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे. धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे’. असे त्यांनी म्हटले आहे. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
काय म्हणाले महंत नामदेव शास्त्री?
“धनंजय मुंडे भेटीला आले होते. त्यांच्याबरोबर आमची दोन तास सविस्तर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असे जाणवले की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असे असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवले जातेय? कारण ते एवढ्या वर्षांपासून आमच्या जवळ आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असेही मला वाटतेय. त्यांचा गावातील, बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असे मला वाटते. गावचा मुद्दा आहे. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. त्याच्यावर माध्यमे आक्षेप घेताहेत. ५३ दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहेत. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहात. त्याची पार्श्वभूमी ही नाहीये ना”, असे महंत नामदेव शास्त्री म्हणाले.
महंत नामदेव महाराज शास्त्री माध्यमांशी बोलत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे का? यावर डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटले की, “आम्ही धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहोत. तसेच बीडच्या घटनेत जे गुन्हेगार आहे त्यांचा शोध सुरु आहे”, असे नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटले आहे.
“मला माध्यमांना असे विचारायचे आहे की ज्या लोकांनी मस्साजोगचे प्रकरण केले. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवले नाही? कारण आधी जी मारहाण केली ती देखील दखल घेण्यासारखी आहे. त्यांच्या गावाचा मुद्दा आहे. मात्र, त्याला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. असेही नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा