मुंबई । Mumbai
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाबाबत बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ ‘बागेश्वर बाबा’ यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद उफाळून आला आहे. नागपुरातील एका भव्य कार्यक्रमात बोलताना शास्त्री यांनी महाराजांविषयी जे विधान केले, त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत असून शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नागपूर येथील ‘भारदुर्गा शक्तिस्थळ’ शिलान्यास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. याच व्यासपीठावरून बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला. शास्त्री म्हणाले की, “युद्ध करताना महाराज थकले होते, त्यांनी आपला मुकूट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करून विश्रांतीची इच्छा व्यक्त केली होती.” त्यांनी पुढे दावा केला की, महाराजांनी राजपाट सोडण्याची तयारी दर्शवली होती, मात्र रामदास स्वामींनी तो मुकूट पुन्हा महाराजांच्या मस्तकी ठेवून त्यांना राज्य चालवण्याची आज्ञा दिली. इतिहासात असा कोणताही संदर्भ नसल्याचे सांगत इतिहासकारांनी आणि शिवप्रेमींनी या विधानाचा धिक्कार केला आहे.
या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी बागेश्वर बाबांचा उल्लेख ‘भोंदू’ असा करत सरकारला धारेवर धरले. “ज्या छत्रपतींनी उभ्या आयुष्यात कधी थकणे जाणले नाही, त्यांच्याबद्दल ‘ते थकले होते’ असे विधान करणारा हा माणूस महाराष्ट्रात पुन्हा दिसता कामा नये. ज्या व्यासपीठावर राज्याचे बडे नेते बसले होते, त्यांच्यासमोर महाराजांचा अवमान होत असताना ते शांत कसे राहू शकतात?” असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच, बागेश्वर बाबावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
रोहित पवारांचं ट्वीट जसंच्या तसं
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना? अशी शंका येते. भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा’, हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं.
यापूर्वीही धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. आता थेट शिवरायांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. या वादामुळे आगामी काळात राज्यातील वातावरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





