Friday, October 9, 2026
HomeनगरNana Patekar : नाना पाटेकर होते श्रीरामपुरचे जावई, त्यांच्या निधनाने श्रीरामपुरकरही हळहळले

Nana Patekar : नाना पाटेकर होते श्रीरामपुरचे जावई, त्यांच्या निधनाने श्रीरामपुरकरही हळहळले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक आठवणी आणि माहिती समोर येत आहे. त्यातच नाना पाटेकर यांचे श्रीरामपूरशी असलेले कौटुंबिक नातेही चर्चेत आले आहे. नाना पाटेकर हे श्रीरामपूरचे जावई असल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या निधनाने श्रीरामपूरकरांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

- Advertisement -

नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांचे माहेरचे नाव नीलकांती हुलदुले असे होते. त्यांचे बालपण व शिक्षणाचा काही काळ श्रीरामपूरमध्ये गेला. त्या आपल्या वडिलांसोबत श्रीरामपूर येथे राहत होत्या. त्यांचे वडील काही काळ श्रीरामपूर येथे एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. नीलकांती यांनी श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयात शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह नाना पाटेकर यांच्याशी झाला आणि त्या नीलकांती पाटेकर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

नीलकांती पाटेकर यांचे बंधू श्रीकांत हुलदुले आणि श्रीरामपूरचे नामदेव भुसे यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. या कौटुंबिक व मैत्रीच्या संबंधांमुळे नीलकांती पाटेकर यांचे श्रीरामपूरशी असलेले नाते कायम राहिले. सुमारे दोन वर्षांपूर्वी नामदेव भुसे यांच्या नातवाच्या विवाह सोहळ्यासाठी नीलकांती पाटेकर श्रीरामपूर येथे आल्या होत्या. विशेष म्हणजे, 1990च्या दशकात नाना पाटेकर स्वतः बोरावके महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी आपण श्रीरामपूरचे जावई असल्याचा आवर्जून उल्लेख केला होता. मी श्रीरामपूरचा जावई आहे आणि माझी पत्नी याच महाविद्यालयात शिकली आहे, असे त्यांनी सांगितल्याची आठवण आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर श्रीरामपूरशी असलेल्या त्यांच्या या नात्याच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. जुन्या जाणत्या नागरिकांनी नाना पाटेकर आणि त्यांच्या कुटुंबाचे श्रीरामपूरशी असलेले संबंध सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह श्रीरामपूर परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिकच; तापमानात २ ते ७ अंशांची वाढ

0
नाशिक | प्रतिनिधी राज्यात यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक तीव्रतेने जाणवत असून, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच कमाल तापमानाने सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांची वाढ नोंदवली आहे....