Wednesday, February 19, 2025
Homeनगरयंदा गोदावरीतून वाहिले 58.4 टिएमसी पाणी

यंदा गोदावरीतून वाहिले 58.4 टिएमसी पाणी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून दोन दिवसांपूर्वी गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. यंदा नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत या हंगामात जायकवाडीच्या दिशेने 58.4 टिएमसी पाणी वाहिले. 1969 मध्ये 185 टिएमसी, 2005 मध्ये 170 टिएमसी तर 2006 मध्ये 162 टिएमसी पाणी वाहिले होते. 2022 मध्ये 125 टिएमसी पाणी वाहिले. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री घाटमाथ्याच्या कुशीतील धरणाच्या पाणलोटात यावर्षी मान्सून फार जोरदार असा बरसला नाही. मात्र धरणं भरून पाणी जायकवाडीला 6 लाख 76 हजार 97 क्युसेक वाहिले. म्हणजेच 58.4 टिएमसी पाणी वाहिले. नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 1976 ते 2024 या कालखंडात केवळ पाच वेळा बंधार्‍यातील विसर्गाने 100 टिएमसीचा टप्पा पार केला आहे. 1981 च्या पावसाळ्यात 130 टिएमसी पाणी गेले होते. नंतर 24 वर्षांनी म्हणजेच 2005 मध्ये 170 टिएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिले होते. 2006 मध्ये 162 टिएमसी, 2019 मध्ये 122 टिएमसी, 2022 मध्ये 125 टिएमसी असा विसर्ग झाल्याची आकडेवारी आहे.

- Advertisement -

जायकवाडी धरणाची क्षमता लक्षात घेतल्यास ते तुडूंब भरून वाहण्याची शक्यता कमी असते. मात्र यावर्षी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने 58.4 टिएमसी पाणी वाहून गेले. बंधारा ते जायकवाडी पर्यंतचा झालेला पाऊस तसेच मराठवाडा भागातील मुक्त क्षेत्रातील पाऊस यामुळे जायकवाडी फुल्ल होऊन त्यातून विसर्ग करण्यात आला. तसे कमी पाणी वाहून जाण्याचेही काही विक्रम आहेत. 1987 च्या हंगामात 661 दलघफू आणि 1995 मध्ये 460 दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिले आहे. त्यावेळी दुष्काळी परिस्थिती होती. 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 च्या आकडेवारी नुसार या हंगामात गोदावरीत 58.4 टिएमसी पाणी वाहून गेले. यंदा सर्वच धरणे तुडूंब भरलेले आहेत. त्यातून ही विसर्ग यापूर्वी करण्यात आले आहेत. सध्या सर्वच धरणातील विसर्ग बंद आहेत.

यावर्षी दारणातून 19.8 टिएमसीचा विसर्ग करण्यात आला. गंगापूरमधून 6.1 टिएमसी, कडवातून 5.4 टिएमसी, मुकणेतून 40 दलघफू, भोजापूर मधून 1.9 टिएमसी, आळंदीतून 341 दलघफू, वालदेवीतून 529 दलघफू तर फिडर डॅम म्हणून ओळखले जाणारे वाकीतून 603 दलघफू, भाममधून 6.2 टिएमसी, भावलीतून 1.7 टिएमसी, गौतमी गोदावरीतून 942 दलघफू, कश्यपीतून 548 दलघफू असा विसर्ग करण्यात आला. या व्यतिरिक्त मुक्त पाणलोटातूनही पाणी वाहून येवून गोदावरीत दाखल होऊन ते जायकवाडीच्या दिशेने वाहिले. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये काल गुरुवारी सकाळी 6 वाजता 99.57 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तो कालच्या तारखेला मागील वर्षी 94.96 टक्के इतका होता.

गोदावरी कालव्यांतर्गत रब्बी पिकांच्या सिंचनासाठी पाणी मागणी अर्जाची मुदत 5 डिसेंबर आहे. शेतकर्‍यांनी तोपर्यंत 7 क्रमांकाचे पाणी मागणी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. 4 किंवा 5 डिसेंबरला गोदावरीच्या कालव्यांना रब्बी हंगामासाठी पाणी सुटण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या