Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारपोलीसांना धक्काबुक्की व वाहनावर दगडफेक प्रकरणी 10 जणांना अटक

पोलीसांना धक्काबुक्की व वाहनावर दगडफेक प्रकरणी 10 जणांना अटक

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

तालुक्यातील शनिमांडळ (तलवाडे खुर्द) येथे अपहृत मुलीच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची मागणी करणार्‍या संशयितास ग्रामस्थांनी चोपले असता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये यासाठी पोलीस दाखल झाले.

- Advertisement -

यावेळी तेथील जमावाने पोलीसांना धक्काबुक्की करत वाहनावर दगडफेक करून नुकसान केले.यामध्ये एका पोलीस कर्मचार्‍याला दुखापत झाली असून याप्रकरणी सुमारे 45 ते 50 जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुणावण्यात आली आहे.उर्वरित संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एक युवती साक्री तालुक्यातील वसमार येथे लग्न समारंभासाठी आली होती. यावेळी सदर युवतीचे अज्ञातांकडून अपहरण करण्यात आले.

दरम्यान याप्रकरणी शनिमांडळ येथील एका इसमाने मुलीच्या वडिलांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून मुलीच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केली. यावेळी मुलीच्या वडिलांनी शनिमांडळ (तलवाडे खुर्द) येथे राहत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. मुलीच्या नातेवाईकांनी पैशांची मागणी करणार्‍या इसमाला इंद्रीहट्टी रस्त्यावरील एका नाल्याजवळून ताब्यात घेवून गावात आणले.

तोपर्यंत अपहरण झालेल्या मुलीचे वडील व नातेवाईक गावात दाखल झाले. संबंधित इसमास ग्रामस्थांसह मुलगी कोठे आहे? याबाबत विचारणा करू लागले.मात्र त्याने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिल्याने जमावाने त्यास चांगलेच चोपले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून काही जणांनी पोलीसांशी संपर्क केला.पोलीसांनी सदरची बाब गांभीर्याने घेवून घटनास्थळी तात्काळ रवाना झाले.

यावेळी संशयितास पोलीसांनी ताब्यात घेतले. संतप्त जमावास पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था हातात न घेण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस व जमावात किरकोळ वाद होत जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केली. यात वाहनाचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून जादा पोलीस कुमक शनिमांडळ येथे रवाना झाले.रात्री उशिरापर्यंत गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रविवारी रात्री याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोना मनोज मुरलीधर वाघ यांच्या फिर्यादीवरून सुमारे 45 ते 50 जणांच्या जमावाविरोधात भादंवि कलम 353, 341,143, 146, 149 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3)/135 प्रमाणे,जिल्हाकार्‍यांच्या मनाई आदेशाचे व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील 10 जणांना अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या