Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार : आय.एम.ए.तर्फे आज बंद

नंदुरबार : आय.एम.ए.तर्फे आज बंद

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचनेविरुध्द आय.एम.ए.ने राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले आहे.

- Advertisement -

त्याच पार्श्वभुमीवर उद्या दि. 11 रोजी देशातील सर्व दवाखाने बंद राहणार आहेत. या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या 219 शाखांमधील 45 हजार डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये पंजीकृत असलेले एकूण 1 लाख 10 हजार डॉक्टर्स सहभागी होणार आहेत.

याशिवाय मेडिकल स्टुडन्टस नेटवर्क (एम.एस.एन.) या आय.एम.ए.च्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेतर्फे एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील 36 सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील 15000 वैद्यकीय विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.

सीसीआयएमच्या अधिसूचनेत बीएएमएस झालेल्या आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात 58 अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे.

सीसीआयएमने आधुनिक वैद्यकीय शल्यक्रियांचे नामांतर संस्कृत शब्दात करून आणि या सर्व मूळ आयुर्वेद शस्त्रक्रिया असल्याचा खोटा दावा केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आयुर्वेद पदव्युत्तर विद्यार्थी आधुनिक वैद्यकाच्या विविध विशेष शाखांमधल्या शस्त्रक्रिया करण्यास पात्र ठरणार आहे.

थोडक्यात, एकच आयुर्वेदिक वैद्य अ‍ॅयपेंडिक्सचे ऑपरेशन करेल, तोच किडनी स्टोन, कानाची शस्त्रक्रिया करेल, डोळ्यातील मोतीबिंदूही तोच काढेल, त्याला पित्ताशयातील खडा काढण्याची दुर्धर शस्त्रक्रियाही करण्यास परवानगी असेल आणि तोच रुग्णांच्या दातांची अवघड शस्त्रक्रिया करण्यास पात्र ठरेल.

आधुनिक वैद्यक शास्त्रातील ज्येष्ठ आणि कुशल शल्यचिकित्सकांनाही शास्त्रक्रियेतील एवढ्या विस्तृत निवडीची कायदेशीर परवानगी नाही.

आयुर्वेदाच्या वैद्यांना एम.एस. अशी पदवी मिळणार आहे. यामुळे रुग्णांना आपण तज्ञ अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांकडून उपचार घेतो आहोत की सीसीआयएमचा हा कोर्स केलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून हे न समजल्यामुळे गोंधळात पडण्याची वेळ येणार आहे.

त्यामुळे सीसीआयएमची अधिसूचना मागे घ्यावी. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या 4 समित्या त्वरित रद्द केल्या पाहिजेत.

वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल यावर सरकारने भर द्यावा, आदी मागण्यांसाठी उद्या दि. 11 रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे.

या बंदमध्ये नंदुरबारसह राज्यभरातील आयएमएचे सर्व सदस्य सहभागी होणार असल्याने उद्या पूर्ण दवाखाने बंद राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या