मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भवितव्याबाबत मोठे आणि खळबळजनक दावे केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, नरेंद्र मोदी हे फक्त ७ ते ८ महिने पंतप्रधानपदी राहतील आणि ते आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत. काँग्रेसच्या कालच्या झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील ६ ते ८ महिन्यांत पंतप्रधानपदी राहणार नाही असे मोठे विधान केले होते, त्यानंतर आज संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपच्या नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला. १७ सप्टेंबरनंतर देशाच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली टर्म पूर्ण करू शकणार नाहीत, हे ते गेल्या अनेक महिन्यांपासून सांगत आहेत. आगामी काळात त्यांना पद सोडावे लागू शकते, असा खळबळजनक दावा केला. ते म्हणाले की, १७ सप्टेंबरनंतर या सर्व गोष्टींचा उलगडा जनतेसमोर होईल.
लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का! ९२ लाख लाभार्थी अपात्र; आता १.६५ कोटी महिलांनाच लाभ
पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस असेल
17 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस आहे, काय आहे, खूप अभ्यास करून इथे उभं रहावं लागत आम्हाला, 17 सप्टेंबर नंतर असे काय होईल ते कळेल, 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा प्रधानमंत्री म्हणून तो शेवटचा वाढदिवस असेल, तो त्यांनी आंनदांत साजरा करावा, त्यांच्या भक्तांनी नाचावं, अंधभक्ताने उड्या माराव्यात, गाणं बिनं गावं, पार्ट्या कराव्यात रात्री, नंतर पुढल्या प्रसंगाला त्यांनी सामोर जावं.
तसेच नरेंद्र मोदींनंतर अमित शाह हे देखील पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकीत त्यांनी वर्तवले. जागतिक पातळीवरील घडामोडी आणि आमच्यासमोर येत असलेली तथ्ये याच्या आधारेच आपण हे विधान करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर यंदाचा पंतप्रधान पदी असताना मोदींचा हा शेवटचा वाढदिवस आहे, तो पंतप्रधान पदाचा त्यांच्या कार्यकाळातला शेवटचा वाढदिवस आहे, असं हे माझं मत आहे. माझ्याकडे जे काय आकलन आहे, किंवा राहुल गांधी जे सांगतात, आम्ही जी काही चर्चा करतो, आमच्या समोर जे काही तथ्य येतात, जसं आम्ही म्हणालो की, लाल किल्ल्यावर त्यांचे प्रधानमंत्री म्हणून शेवटचे भाषण आहे, तसं हा प्रधानमंत्री म्हणून त्यांचा वाढदिवस कदाचित शेवटचा असेल, हे जवळजवळ जागतिक स्तरावरच मी चित्र सांगतोय, असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे.




